धाराशिव: जिल्ह्यात सध्या भुरट्या चोरांचा धुमाकूळ सुरू असून बंद घरे, यात्रेतील दुचाकी, रेल्वेच्या पुलाचे बांधकाम साहित्य आणि चक्क धावत्या मालवाहू वाहनालाही चोरट्यांनी लक्ष्य केले आहे. गेल्या काही दिवसांत घडलेल्या या वेगवेगळ्या पाच घटनांमध्ये एकूण ७ लाख ८५ हजार रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल चोरीला गेला असून एका घटनेत यंत्राचे ४ लाखांचे नुकसान करण्यात आले आहे. याप्रकरणी सोमवारी (ता. २०) जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
शिवसृष्टीनगरमध्ये बंद घर फोडले
धाराशिव शहरातील शिवसृष्टीनगर येथील रहिवासी शरद भास्कर थोडसरे (वय ४१) यांचे घर बंद असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून आत प्रवेश केला. १८ ते १९ एप्रिल दरम्यान घडलेल्या या घटनेत घरातील ४० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, दोन अंगठ्या आणि ५० हजार रुपयांची रोकड असा एकूण २ लाख ४० हजार रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला. याप्रकरणी आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कळंब तालुक्यात शेजाऱ्यांची दोन घरे फोडली
कळंब तालुक्यातील हासेगाव (केज) येथे राहणारे रघुनाथ भगीरथ शिंदे (वय ३२) आणि त्यांच्या शेजारी राहणाऱ्या सुनीता मोगले यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी १५ ते १६ एप्रिलच्या रात्री प्रवेश केला. चोरट्यांनी दोन्ही घरांमधून सोन्या-चांदीचे दागिने आणि एक मोबाईल असा एकूण २ लाख ७२ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. कळंब पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
धावत्या ट्रकमधून हरभऱ्याची चोरी
चोरट्यांनी चक्क धावत्या वाहनावर चढून चोरी करण्याची धाडसी आणि धक्कादायक घटना ढोकी हद्दीत समोर आली आहे. शिवराज धनराज थळकरी (रा. युसुफ वडगाव, ता. केज) हे त्यांच्या आयशर गाडीतून (MH 14 EM 0523) शिंगोली येथील नाफेड केंद्रावरून हरभऱ्याचे ३६० कट्टे लातूर येथील वखार महामंडळाच्या गोदामात घेऊन जात होते. १९ ते २० एप्रिलच्या रात्री ढोकी-पळसप पाटी दरम्यान अज्ञात चोरट्यांनी चालत्या वाहनावर मागून चढून ताडपत्री फाडली आणि ३२ हजार ३१२ रुपये किमतीचे हरभऱ्याचे ११ कट्टे खाली फेकून चोरून नेले. ढोकी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रेल्वे पुलाच्या कामावरील साहित्य पळवले
धाराशिव शहरातील वरुडा ब्रिज येथे सुरू असलेल्या रेल्वेच्या कामावरील साहित्यही सुरक्षित राहिले नाही. १९ एप्रिल रोजी सायंकाळी पाईल मशीनचे २ लाख रुपये किमतीचे पाच रोलर बीट प्रवीणसिंग (रा. मध्य प्रदेश) या आरोपीने चोरून नेले. तसेच तिथे असलेल्या ट्रान्झिट मिक्सरचे सुमारे ४ लाख रुपयांचे नुकसान केले. याप्रकरणी अमित अंगदराव बिराजदार यांच्या फिर्यादीवरून आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोनारी यात्रेतून दुचाकीची चोरी
परंडा तालुक्यातील बावची येथील मुकेश आण्णा यादव (वय ३१) यांची ४० हजार रुपये किमतीची ‘स्प्लेंडर प्लस’ दुचाकी (MH 12 NC 2759) सोनारी यात्रेदरम्यान डोमगाव रोडवरील ओढ्याजवळून १५ एप्रिल रोजी चोरीला गेली. आंबी पोलीस ठाण्यात याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.







