धाराशिव: महाराष्ट्र दिनाचा उत्साह सर्वत्र असतानाच आज धाराशिवमध्ये एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना घडली आहे. प्रलंबित वेतन आणि नोकरीच्या प्रश्नावरून एका महिलेने शासकीय मध्यवर्ती इमारतीसमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. या घटनेत संबंधित महिला गंभीररीत्या भाजली असून तिची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे.
७० टक्के भाजल्याने प्रकृती गंभीर
या घटनेनंतर पीडित महिलेला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुरुवातीला महिला ४० टक्के भाजल्याची चर्चा होती, मात्र शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता शैलेंद्र चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले की, संबंधित महिला ७० टक्के भाजली आहे. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
नेमकी घटना काय?
महाराष्ट्र दिनानिमित्त शासकीय मध्यवर्ती इमारतीसमोर झेंडावंदनाचा मुख्य शासकीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमादरम्यान बीबी किशन राव पाटील या महिलेने अचानक स्वतःला पेटवून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. तातडीने पोलिसांनी आणि उपस्थित नागरिकांनी आग विझवून त्यांना रुग्णालयात हलवले.
प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे टोकाचे पाऊल?
मिळालेल्या माहितीनुसार, बीबी किशन राव पाटील या भूविकास बँकेत नोकरीला होत्या. बँकेवर प्रशासक आल्याने त्यांच्या नोकरीचा प्रश्न निर्माण झाला होता. “आम्हाला बँकिंग क्षेत्रात सामावून घ्या किंवा आमचे संपूर्ण थकीत पगार द्या,” अशी त्यांची प्रशासनाकडे वारंवार मागणी होती. प्रलंबित वेतन आणि लाभांमुळे त्या गेल्या अनेक दिवसांपासून तीव्र मानसिक तणावाखाली होत्या.
प्रशासनावर गंभीर आरोप
या आत्मदहनापूर्वी संबंधित महिलेने २० तारखेलाच प्रशासनाला आत्मदहन करणार असल्याचे निवेदन दिले होते. मात्र, प्रशासनाने या निवेदनाची गांभीर्याने दखल घेतली नसल्याचा आरोप आता नातेवाईकांनी केला आहे. “या दुर्दैवी घटनेला पूर्णपणे प्रशासनच जबाबदार आहे,” असा संताप नातेवाईकांनी व्यक्त केला आहे.
महाराष्ट्र दिनासारख्या महत्त्वाच्या दिवशी, जिथे कडेकोट बंदोबस्त आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित असतात, तिथेच ही घटना घडल्याने प्रशासनाच्या कामकाजावर आणि संवेदनशीलतेवर आता मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.






