भूम : पोलीस ठाण्यात शासकीय कामकाज करत असलेल्या महिला पोलीस अंमलदाराच्या अंगावर धावून जात, ‘तू तक्रार कशी घेते तेच पाहतो’ अशी धमकी देत एका तरुणाने थेट कॉम्प्युटर बंद करून राडा घातल्याचा धक्कादायक प्रकार भूम पोलीस ठाण्यात घडला आहे. याप्रकरणी शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याच्या आरोपावरून एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रमेश ऊर्फ करण नानासाहेब भालेराव (रा. रामेश्वर, ता. भूम, जि. धाराशिव) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस अंमलदार सुलभा सुरेश गदळे (वय ३५) यांनी भूम पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (ता. ७) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास भूम पोलीस ठाण्यातील सीसीटीएनएस (CCTNS) कक्षात महिला पोलीस अंमलदार सुलभा गदळे या आपले दैनंदिन शासकीय कामकाज करत होत्या. यावेळी आरोपी रमेश भालेराव हा अचानक तिथे आला. त्याने थेट सुलभा गदळे यांच्या अंगावर धावून जात “तू कशी तक्रार घेते,” असे म्हणत हुज्जत घातली.
तसेच, रागाच्या भरात त्याने संगणकाचे (कॉम्प्युटर) मेन बटन बंद करून कीबोर्ड आणि माऊसच्या वायर्स ओढल्या व साहित्याची ओढाओढ केली. शासकीय कामात जाणीवपूर्वक अडथळा निर्माण करून आरोपीने शिवीगाळ करत धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
पोलीस ठाण्यातच महिला पोलिसासोबत गैरवर्तन झाल्याने एकच खळबळ उडाली. याप्रकरणी सुलभा गदळे यांनी गुरुवारी (ता. ७) दिलेल्या प्रथम खबरीवरून भूम पोलीस ठाण्यात आरोपी रमेश भालेराव याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १३२, ३२४(३), ३५२ आणि ३५१(२) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास भूम पोलीस करत आहेत.







