तेर (धाराशिव): ऐतिहासिक तेर नगरीमध्ये शेतजमिनीच्या कारणावरून सख्ख्या भावांमध्ये रक्ताचा थरार उडाला आहे. शेतात काम करत असलेल्या ५५ वर्षीय व्यक्तीवर त्याच्याच भावाने आणि पुतण्यांनी कुऱ्हाड तसेच फायटरने घातक हल्ला चढवला. या जीवघेण्या हल्ल्यात वृद्ध गंभीर जखमी झाले असून, ढोकी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील या घटनेप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुक्तार उमराव मुलाणी (वय ५५, रा. विठ्ठलनगर, तेर, ता. जि. धाराशिव) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी सत्तार उमराव मुलाणी, जब्बार उमराव मुलाणी, शकील सत्तार मुलाणी आणि पापा ऊर्फ अखिल सत्तार मुलाणी (सर्व रा. तेर, ता. जि. धाराशिव) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
शेत गट नंबर ७६५ मधील घटना
फिर्यादी मुक्तार मुलाणी आणि आरोपींमध्ये शेतजमिनीवरून जुना वाद सुरू आहे. गेल्या रविवारी (दि. २४ मे) दुपारी दीड वाजेच्या सुमारास मुक्तार हे तेर शिवारातील शेत गट नंबर ७६५ मध्ये असताना, आरोपींनी संगनमत करून त्यांना घेरले. “हे शेत आमचे आहे,” असे म्हणत त्यांनी मुक्तार यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली.
कुऱ्हाड आणि फायटरने केले वार
वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपींनी मुक्तार यांना अत्यंत अश्लील भाषेत शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली. याच दरम्यान आरोपींनी सोबत आणलेली कुऱ्हाड आणि हातातील लोखंडी फायटरने मुक्तार यांच्यावर सपासप वार केले. या अचानक झालेल्या हल्ल्यात मुक्तार यांच्या डोक्याला व शरीरावर गंभीर जखमा झाल्या असून ते रक्ताच्या थारोळ्यात पडले. “आज तुला जिवंत सोडत नाही,” अशी धमकी देत आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला.
ढोकी पोलिसांत गुन्हा दाखल
या रक्तरंजित घटनेनंतर जखमी मुक्तार मुलाणी यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांनी मंगळवारी (दि. २६ मे) दिलेल्या प्रथम खबरीवरून आरोपी सत्तार मुलाणी, जब्बार मुलाणी, शकील मुलाणी आणि अखिल मुलाणी यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(२), ११८(१), ३५२, ३५१(२), ३५१(३) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ढोकी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.





