धाराशिव : जिल्हा होमगार्ड प्रशिक्षण कार्यालयात महिलांना शिवीगाळ, दमदाटी आणि अश्लील हावभाव केल्याप्रकरणी वादग्रस्त झिरो पोलिसाविरोधात अखेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी विनयभंग आणि लाचखोरीच्या आरोपांमुळे चर्चेत असलेल्या या झिरो पोलिसाचा आणखी एक कारनामा समोर आल्याने संताप व्यक्त होत आहे.
पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या फिर्यादीनुसार, मंगळवारी (दि. १७ जून) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास जिल्हा होमगार्ड प्रशिक्षण कार्यालयात मोहरम बंदोबस्त वाटपाचे काम सुरू होते. यावेळी होमगार्ड कर्मचारी राधा अनिल गायकवाड यांनी संबंधितास, “तुम्ही कोण आहात? बंदोबस्त वाटप करणारे तुम्ही बाहेरचे लोक कसे?” असा प्रश्न विचारला.
या प्रश्नाचा राग मनात धरून संबंधित राम लक्ष्मण बोंदर या झिरो पोलिसाने सरकारी कार्यालयातच महिलेला अश्लील हावभाव करून अपमानास्पद भाषा वापरल्याचा आरोप आहे. फिर्यादीनुसार, “जा तुला काय xx उपटायचे ते उपट” तसेच “काय भारी बांधायचे ते बांध” अशा स्वरूपाची भाषा वापरत संबंधिताने पीडितेला धमकी दिली. एवढ्यावरच न थांबता, “तू गेटच्या बाहेर भेट, मग तुला बघतो” अशी उघड धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी राम लक्ष्मण बोंदर विरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २९२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ७५(३), ७९, ३५१(२) आणि ३५२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
याप्रकरणी धाराशिव लाइव्हने काही वेळापूर्वी बातमी दिली होती, होमगार्ड कार्यलयात धिंगाणा घातल्याचा व्हिडीओ प्रसारित केला होता. धाराशिव लाइव्हच्या दणक्यानंतर हा गुन्हा दाखल झाला आहे.
विशेष म्हणजे, याच झिरो पोलिसाविरोधात काही दिवसांपूर्वी आनंदनगर पोलीस ठाण्यात एका खासगी रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्याशी अश्लील वर्तन करून विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. त्याआधी धाराशिवच्या आठवडे बाजारात पोलिसांच्या संगनमताने लाच घेतल्याचे प्रकरणही समोर आले होते.
एका मागोमाग एक गंभीर आरोप समोर येत असतानाही संबंधितावर अद्याप कठोर कारवाई का होत नाही, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. संबंधितास तात्काळ अटक करून निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
या प्रकरणात संबंधित झिरो पोलिसाचे आणि आठवडे बाजारातील कथित लाच प्रकरणात अडकलेल्या काही पोलिस कर्मचाऱ्यांचे साटेलोटे असल्याचा आरोपही केला जात आहे. गुन्हा दाखल होण्यापूर्वी संबंधित पोलिसांशी मोबाईलवर वारंवार संपर्क झाल्याचा दावा करण्यात येत असून, याबाबत कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) तपासणी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.





