कळंब : कळंब बसस्थानकात बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने ६० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठन चोरून नेल्याची घटना ३ ऑगस्ट रोजी घडली. याप्रकरणी कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुंदा महारुद्र हुंडेकर (वय ६४, रा. विद्या भवन शाळेसमोर, पुनर्वसन सावरगाव, ता. कळंब) या ३ ऑगस्ट रोजी दुपारी २ ते २.४५ वाजण्याच्या सुमारास कळंब बसस्थानकात कळंब-मुरुड बसमध्ये चढत होत्या. यावेळी गर्दीचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीने त्यांच्या गळ्यातील २७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठन चोरून नेले. या गंठनाची किंमत सुमारे ६० हजार रुपये आहे.
या प्रकरणी कुंदा हुंडेकर यांनी ८ ऑगस्ट रोजी दिलेल्या फिर्यादीवरून कळंब पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
बाभळगाव शिवारातील विहिरीतून दोन पाणबुडी मोटारी चोरीला
कळंब : बाभळगाव शिवारातील शेतातील विहिरीत बसवलेल्या दोन पाणबुडी मोटारी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या मोटारींची किंमत सुमारे ३५ हजार रुपये असून, येरमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंजुश्री गोरख वाघमारे (वय ४४, रा. बाभळगाव, ता. कळंब) यांच्या बाभळगाव शिवारातील गट क्रमांक २०८ मधील विहिरीत दोन पाणबुडी मोटारी बसवण्यात आल्या होत्या. ३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ ते ४ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने या दोन्ही मोटारी चोरून नेल्या.
चोरीस गेलेल्या दोन्ही मोटारींची एकूण किंमत ३५ हजार रुपये आहे. याप्रकरणी मंजुश्री वाघमारे यांनी ८ ऑगस्ट रोजी दिलेल्या फिर्यादीवरून येरमाळा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.




