कळंब : गोविंदपुर शिवारातील शेतात एका ४० वर्षीय व्यक्तीला विनाकारण शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी तसेच धारदार शस्त्राने मारहाण केल्याची घटना ११ ऑगस्ट रोजी रात्री घडली. या प्रकरणी शिराढोण पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मिठ्ठु अमृत मुंडे व त्याच्यासोबतच्या एका इसमाने ११ ऑगस्ट रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास वैभव मुंडे यांच्या गोविंदपुर शिवारातील शेतात फिर्यादी अशोक भागवत पुरी (वय ४०, रा. गोविंदपुर, ता. कळंब) यांना विनाकारण शिवीगाळ केली.
यानंतर आरोपींनी लाथाबुक्क्यांनी तसेच धारदार शस्त्राने मारहाण करून पुरी यांना गंभीर जखमी केले. तसेच, “तू कोणाला सांगितलेस तर पुढच्या वेळेस जिवंत सोडणार नाही,” अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
याप्रकरणी अशोक पुरी यांनी १३ ऑगस्ट रोजी दिलेल्या फिर्यादीवरून शिराढोण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(२), ११५(२), ३५२, ३५१(२) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शिराढोण पोलीस करीत आहेत.






