कळंब : मोटरसायकलने कट मारल्याच्या कारणावरून २२ वर्षीय तरुणाला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी तसेच कोयत्याने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना कळंब शहरात १३ ऑगस्ट रोजी सायंकाळी घडली. याप्रकरणी कळंब पोलीस ठाण्यात एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रेयश श्रीनिवास धावारे (वय २२, रा. बाबानगर, कळंब) हे विद्याभवन शाळेच्या पाठीमागील परिसरात असताना आरोपी प्रतिक गायकवाड (रा. पुनर्वसन सावरगाव, ता. कळंब) याने मोटरसायकलने कट का मारला, असे विचारण्याच्या कारणावरून त्यांच्याशी वाद घातला.
यानंतर आरोपीने श्रेयश धावारे यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच कोयत्याने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. त्यानंतर जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी श्रेयश धावारे यांनी १३ ऑगस्ट रोजी दिलेल्या फिर्यादीवरून कळंब पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(२), ११५(२), ३५२ व ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास कळंब पोलीस करीत आहेत.






