धाराशिव : खासदार ओमराजे निंबाळकर यांनी २३ जून रोजी शिवसेना ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर आज, १५ ऑगस्ट रोजी शिंदे गटातील मोजक्या कार्यकर्त्यांसाठी गोवर्धनवाडी येथील निवासस्थानी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनाही निमंत्रित करण्यात आले होते.
पालकमंत्री प्रताप सरनाईक स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून गेल्यानंतर शिंदे गटातील दोन कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याच्या बातम्या प्रसिद्धी माध्यमांतून समोर आल्या होत्या. मात्र, या बातम्या चुकीच्या असून दोघांमध्ये हाणामारी झाली नसल्याचा खुलासा माजी नगरसेवक सोमनाथ गुरव यांनी केला आहे.
सचिन शेंडगे आणि मोईन पठाण हे अनेक वर्षांपासून एकमेकांचे मित्र आहेत. स्नेहभोजनाच्या कार्यक्रमादरम्यान चेष्टा-मस्करीतून दोघांमध्ये शाब्दिक बोलाचाली झाली. मात्र, त्याचे रूपांतर हाणामारीत झालेले नाही, असे सोमनाथ गुरव यांनी स्पष्ट केले.
त्यामुळे स्नेहभोजनाच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याच्या चर्चांना पूर्णविराम देत संबंधित बातम्या चुकीच्या असल्याचे गुरव यांनी सांगितले.


