धाराशिव: कुंपणानेच शेत खाल्ल्याचा आणि ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ या वन विभागाच्या कोट्यवधींच्या घोटाळ्याचा पर्दाफाश करणाऱ्या बातमीचा मोठा दणका प्रशासनाला बसला आहे. ‘धाराशिव लाईव्ह’ने हे प्रकरण चव्हाट्यावर आणताच झोपलेल्या वन विभागाला अखेर जाग आली असून, आज सकाळपासूनच आंबेवाडी येथील वन विभागाच्या गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटवण्याच्या धडक कारवाईला सुरुवात झाली आहे.
जेसीबी अन् कडेकोट पोलीस बंदोबस्त!
जुनी झाडे तोडण्यासाठी १ कोटी १५ लाख रुपये खर्चून रान मोकळे केले आणि त्यानंतर त्याच ६५ एकर जमिनीवर भूमाफियांनी अतिक्रमण केल्याचे धक्कादायक वास्तव समोर आल्यानंतर प्रशासनात एकच खळबळ उडाली होती. अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करण्यापर्यंत गेलेल्या या प्रकरणात बातमी प्रकाशित होताच वन अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले. आज सकाळपासूनच आंबेवाडीत कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, जेसीबीच्या साहाय्याने हे अतिक्रमण मुळासकट उखडून फेकण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
शेड मारले अन् चक्क शेतीही सुरू! (अतिक्रमणधारकांची मुजोरी)
- या सरकारी जमिनीवर अतिक्रमणधारकांनी किती मुजोरी केली होती, याचे संतापजनक चित्र कारवाईदरम्यान स्पष्ट झाले.
- तब्बल चार ते पाच लोकांनी वन विभागाच्या या जागेवर बेकायदेशीरपणे राहण्यासाठी पक्के शेड मारले होते तसेच २५ ते ३० झोपड्या होत्या, त्या आज हटवण्यात आल्या.
- एवढेच नाही, तर शासनाची जमीन स्वतःच्या मालकीची असल्याच्या थाटात ट्रॅक्टरने जमीन नांगरून तिथे राजरोसपणे शेतीही केली जात होती.
आज प्रशासनाचे जेसीबी आणि ट्रॅक्टर लावून हे सर्व अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात आले असून, बेकायदेशीर शेड पाडण्यात आले आहेत.
‘धाराशिव लाईव्ह’च्या दणक्यानेच वन विभागाच्या घशात अडकलेला हा घास आणि हडप झालेली ६५ एकर जमीन पुन्हा शासनाच्या ताब्यात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
गुंडगिरी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा!
केवळ अतिक्रमण काढले म्हणजे वन विभागाचे पाप धुतले जाणार नाही. सरकारी जागेवर अतिक्रमण करून प्रशासनातील अधिकाऱ्यांनाच ब्लॅकमेल करण्यापर्यंत मजल गेलेल्या या प्रवृत्तींना कायमचे ठेचून काढण्याची गरज आहे. या भूमाफियांनी आणि गुंडगिरी करून जमीन बळकावणाऱ्या प्रवृत्तींवर आता केवळ कारवाईचा देखावा न करता, त्यांच्यावर कठोर गुन्हे दाखल करावेत, अशी आक्रमक मागणी आता परिसरातील जागरूक नागरिकांकडून केली जात आहे.





