धाराशिव – धाराशिव शहरातील गजबजलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील ॲक्सिस बँकेशेजारी असलेल्या किराणा दुकानासमोरून एक ३२ वर्षीय तरुण संशयास्पदरीत्या बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी गुप्तपणे व गैरकायद्याने डांबून ठेवण्याच्या हेतूने त्याचे अपहरण केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, याप्रकरणी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
बुद्रुक बरमगाव (ता. जि. धाराशिव) येथील रहिवासी अनिता नामदेव सिरसाटे यांचा मुलगा राजकुमार नामदेव सिरसाटे (वय ३२ वर्षे) हा २२ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास धाराशिव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आला होता.
तेथील ॲक्सिस बँकेशेजारी असलेल्या देवगुडे यांच्या किराणा दुकानाजवळून तो अचानक बेपत्ता झाला. बराच वेळ झाला तरी मुलगा घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. नातेवाईक व मित्रपरिवारात शोध घेऊनही त्याचा काहीच थांगपत्ता लागला नाही. त्यामुळे अज्ञात इसमाने त्याला अज्ञात कारणासाठी गुप्तपणे गैरपरिरुद्ध करण्याच्या हेतूने पळवून नेल्याची दाट शंका निर्माण झाली.
धाराशिव शहर पोलिसांत गुन्हा नोंद
सर्वत्र शोध घेऊनही मुलगा न सापडल्याने अखेर आई अनिता नामदेव सिरसाटे (वय ५० वर्षे, रा. बुद्रुक बरमगाव) यांनी १ ऑक्टोबर २०२६ रोजी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात जाऊन रीतसर फिर्याद दिली. त्यांच्या प्रथम खबरेवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे:
-
आरोपी : अज्ञात इसम.
-
दाखल कलम : भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १४०(३) (अपहरण).
शहराच्या मध्यवर्ती भागातून तरुण बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे धाराशिव शहर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.





