धाराशिव: जिल्ह्यात निर्माण झालेल्या तीव्र दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे १००% नुकसान झाले असून, प्रशासनाने कोणत्याही कागदपत्रांची अट न लादता सरसकट पंचनामे पूर्ण करावेत, अशी आग्रही मागणी आमदार कैलास पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे केली आहे.
धाराशिव जिल्ह्यात यंदाच्या भीषण दुष्काळामुळे खरीप आणि इतर पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. सध्या शासकीय पातळीवर नुकसानग्रस्त भागांत पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी करताना संबंधित अधिकारी व कर्मचारी शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी, ओळखपत्र क्रमांक, बँकेचे तपशील (खाते क्रमांक, आयएफएससी कोड), मोबाईल क्रमांक आणि जिओ-टॅगिंग फोटो अशा विविध तांत्रिक कागदपत्रांची सक्ती करत असल्याचे चित्र समोर आले आहे.
आधीच अस्मानी संकटामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना या तांत्रिक अटींमुळे नाहक मनस्ताप आणि आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याकडे आमदार पाटील यांनी लक्ष वेधले. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी इंटरनेट कनेक्टिव्हिटीची मोठी समस्या असल्याने ही कागदपत्रे वेळेत उपलब्ध करणे शेतकऱ्यांसाठी कठीण ठरत आहे. केवळ कागदपत्रे वेळेत सादर केली नाहीत म्हणून कोणताही नुकसानग्रस्त शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित राहता कामा नये, असा इशाराही त्यांनी दिला.
“पंचनाम्याचा मुख्य हेतू हा प्रत्यक्ष झालेल्या पीक नुकसानीची वस्तुनिष्ठ नोंद घेणे हा असायला हवा, कागदपत्रांची तपासणी करणे नव्हे. त्यामुळे प्रशासनाने आधी शेतातील प्रत्यक्ष परिस्थिती पाहून १००% बाधित क्षेत्र म्हणून सरसकट पंचनामे करावेत,” असे आमदार पाटील यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ आदेश जारी करावेत आणि कागदपत्रांअभावी पंचनामे रोखले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.




