धाराशिव : जिल्ह्यातील तुळजापूर आणि कळंब तालुक्यात चोरीच्या तीन वेगवेगळ्या घटना समोर आल्या आहेत. या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
अपसिंगा शिवारातून 87 हजारांचा कॉपर वायर चोरीला
तुळजापूर तालुक्यातील अपसिंगा शेतशिवारात विविध शेतकऱ्यांच्या मोटारी व सोलार यंत्रणेतील कॉपर वायर अज्ञात चोरट्यांनी लंपास केला. 30 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 ते 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान ही चोरी झाली.
अजय विष्णू पवार यांच्या फिर्यादीनुसार, फिनोलेक्स कंपनीची 31 मीटर कॉपर वायर, अमरजीत मुरलीधर सरडे यांची 77 मीटर, विशाल कृष्णांत साठे यांची 120 मीटर, नंदकिशोर दशरथ पवार यांची लक्ष्मी कंपनीची 46 मीटर वायर, चित्रकला श्रीमंत पवार यांची मोटार व सोलारची 65 मीटर कॉपर वायर तसेच किरण अरुण जाधव यांची लक्ष्मी मोटार व सोलारची 152 मीटर वायर चोरीला गेली. या मालाची एकूण किंमत 87 हजार 840 रुपये आहे.
या प्रकरणी अजय पवार यांनी 1 ऑक्टोबर रोजी दिलेल्या फिर्यादीवरून तुळजापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 303(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कळंबमध्ये घरासमोरून दोन दुचाकी चोरीला
कळंब शहरातील दत्तनगर परिसरात घरासमोर उभ्या केलेल्या दोन दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या. मारुती शिवाजी शिंपले यांच्या फिर्यादीनुसार, त्यांच्या मालकीची काळ्या-लाल रंगाची होंडा शाईन (एमएच 44 डब्ल्यू 9075) आणि ग्रे रंगाची स्प्लेंडर प्लस (एमएच 20 एफडब्ल्यू 7853) अशा दोन मोटरसायकली चोरीला गेल्या.
29 सप्टेंबर रोजी रात्री 10 ते 30 सप्टेंबर रोजी सकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. चोरीस गेलेल्या दोन्ही दुचाकींची एकूण किंमत 15 हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी 1 ऑक्टोबर रोजी कळंब पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम 303(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भोगजीतील अंगणवाडी फोडली; गॅस शेगडी, सिलेंडर आणि टीव्ही चोरीला
कळंब तालुक्यातील भोगजी येथील चिलवंत वस्तीवरील अंगणवाडीमध्येही चोरीची घटना घडली. 21 सप्टेंबर रोजी रात्री 11 ते 22 सप्टेंबर रोजी पहाटे 5 वाजण्याच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने अंगणवाडीतील साहित्य चोरून नेले.
चोरीस गेलेल्या वस्तूंमध्ये एक काळसर रंगाची गॅस शेगडी, दोन एचपी गॅस कंपनीचे सिलेंडर आणि एक एलईडी टीव्हीचा समावेश असून, या साहित्याची एकूण किंमत 12 हजार 500 रुपये आहे.
याप्रकरणी अंगणवाडीशी संबंधित आशा सुमंत खराटे यांनी 1 ऑक्टोबर रोजी फिर्याद दिली. त्यावरून कळंब पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम 305(ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या तिन्ही घटनांमुळे शेतशिवार, घरासमोर तसेच सार्वजनिक संस्थांमधील साहित्याच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, संबंधित प्रकरणांचा तपास पोलीस करीत आहेत.





