परंडा / आंबी – घरात एकट्या असलेल्या विवाहितेला खांबाला बांधून आणि सुरीचा धाक दाखवून सोन्या-चांदीचे दागिने लुटल्याची थरारक घटना परंडा तालुक्यातील देवगाव (बु.) येथे घडली आहे. एका महिलेसह आलेल्या दोघांनी भरदिवसा हा दरोडा टाकत तब्बल २ लाख ८४ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला असून, याप्रकरणी आंबी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
देवगाव बुद्रुक (ता. परंडा) येथील रहिवासी रंजना सोमनाथ रणखांब (वय २६ वर्षे) या आपल्या राहत्या घरात असताना एका अनोळखी महिलेने आणि पुरुषाने घरात अचानक प्रवेश केला.
त्यांनी रंजना यांच्या तोंडाला स्कार्फने घट्ट बांधून त्यांना दाव्याने (दोरीने) घरातील खांबाला बांधून ठेवले. त्यानंतर सुरीचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली आणि घरात असलेले सोन्याचे व चांदीचे दागिने असा एकूण २ लाख ८४ हजार रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने लुटून नेला. लुटारूंनी पलायन केल्यानंतर फिर्यादीने कशीबशी सुटका करून घेत पोलिसांत धाव घेतली.
आंबी पोलिसांत गुन्हा नोंद
याप्रकरणी रंजना रणखांब यांनी २७ ऑगस्ट २०२६ रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरून आंबी पोलीस ठाण्यात अज्ञात महिला व पुरुषाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०९(४) आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. भरदिवसा घडलेल्या या जबरी चोरीच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, आंबी पोलीस संशयितांचा शोध घेत आहेत.





