धाराशिव – स्टुडंट इस्लामिक ऑर्गनायझेशन (SIO) या संघटनेच्या नावाचा गैरवापर करून, सोशल मीडियाद्वारे जकात व देणगीचे आवाहन करत स्वतःच्या वैयक्तिक बँक खात्यांवर लाखो रुपयांचा निधी जमा करून लोकांची फसवणूक केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. दहशतवाद विरोधी पथकाच्या (ATS) तक्रारीवरून धाराशिव शहर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध फसवणूक आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये (IT Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमका प्रकार काय?
आरोपी अस्लम चांदपाशा शेख (रा. खाजा नगर, धाराशिव) आणि ‘एसआयओ’ धाराशिवचा सदस्य निहाल सिकंदर शेख (रा. सुलतानपुरा, येडशी रोड, धाराशिव) या दोघांनी संगनमत केले. त्यांनी ८ मार्च २०२५ ते २ सप्टेंबर २०२६ या कालावधीत ‘स्टुडंट इस्लामिक ऑर्गनायझेशन’ (SIO) धाराशिव या संघटनेच्या सोशल मीडिया अकाउंट्सचा वापर केला.
लोकांना जकात देण्याचे आमिष दाखवून त्यांचा विश्वास संपादन केला व संघटनेच्या नावावर देणगी देण्याचे आवाहन केले. मात्र, ही देणगी संघटनेच्या अधिकृत बँक खात्यावर जमा न करता, आरोपींनी स्वतःचे वैयक्तिक मोबाईल नंबर (७८७५९५९०४९, ७०२०१५२०५१), यूपीआय आयडी (UPI ID) आणि क्यूआर कोड (QR Code) सोशल मीडियावर प्रसारित केले. या माध्यमातून परस्पर स्वतःच्या वैयक्तिक खात्यांवर निधी जमा करून लोकांची आर्थिक फसवणूक केली.
दहशतवाद विरोधी पथकाची (ATS) कारवाई
या गैरव्यवहाराची माहिती मिळताच दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) प्रकरणाची पडताळणी केली. त्यानंतर दहशतवाद विरोधी पथक, छत्रपती संभाजीनगर युनिट (कॅम्प धाराशिव) येथील पोलीस अंमलदार फयाजोद्दीन गयासोद्दीन काझी (वय ४९ वर्षे) यांनी २ सप्टेंबर २०२६ रोजी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात सरकारतर्फे फिर्याद दिली.
गुन्हा दाखल
या फिर्यादीवरून आरोपी अस्लम शेख आणि निहाल शेख या दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१६(२), ३१८(४), ३(५) सह माहिती तंत्रज्ञान कायदा (IT Act) कलम ६६(ड) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. संघटनेच्या नावावर डिजिटल माध्यमातून अशा प्रकारे किती लोकांची फसवणूक झाली आणि किती निधी जमा करण्यात आला, याचा सखोल तपास धाराशिव शहर पोलीस करत आहेत.




