कळंब : कळंब तालुक्यातील मौजे दुधाळवाडी परिसरात गेल्या ४५ ते ५० दिवसांपासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने शेतकरी आणि पशुपालकांसमोर चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पावसाअभावी खरीप पिकांची वाढ खुंटली असून अनेक ठिकाणी पिके वाळून जात आहेत.
दुधाळवाडी परिसरातील शेतकऱ्यांनी जनावरांसाठी मका, ज्वारी यासह विविध चारा पिकांची लागवड केली होती. मात्र, सातत्याने पाऊस नसल्याने ही चारा पिकेही संकटात सापडली आहेत. सोयाबीनचे पीक पूर्णपणे उध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे जनावरांना हिरवा चारा उपलब्ध करून देणे पशुपालकांसाठी मोठे आव्हान बनले आहे.
दुधाळवाडी गावात दररोज साधारण ४८०० ते ५००० लिटर दूध उत्पादन होते. मात्र, चाऱ्याची कमतरता निर्माण झाल्याने त्याचा थेट परिणाम दूध उत्पादनावर होण्याची शक्यता आहे. चारा उपलब्ध होत नसल्याने पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
या परिस्थितीची शासनाने तातडीने दखल घेऊन दुधाळवाडी परिसरात चारा छावण्या सुरू कराव्यात, जनावरांसाठी चारा उपलब्ध करून द्यावा तसेच दुष्काळसदृश परिस्थितीचे पंचनामे करून शेतकरी व पशुपालकांना तातडीची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
“गेल्या ४५ ते ५० दिवसांपासून दुधाळवाडी परिसरात पाऊस झालेला नाही. त्यामुळे चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला असून त्याचा परिणाम दूध उत्पादनावर होत आहे. शासनाने लवकरात लवकर दखल घेऊन चारा छावण्या सुरू कराव्यात.”
— अमोल लाटे, शेतकरी, दुधाळवाडी






