नमस्कार वाचकहो! ‘धाराशिव लाइव्ह’च्या या भन्नाट मालिकेत तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण अशा एका ‘पाणीदार’ फसवणुकीची गोष्ट बघणार आहोत, जी गेली ४० वर्षे एकाच कुटुंबाने धाराशिवकरांना ऐकवली आहे. निसर्गाचा कोप आणि साहेबांच्या खोट्या घोषणा, यात धाराशिवचा शेतकरी कसा भरडला जातोय, याचा हा जिवंत पुरावा!
चला तर मग, पाहूया फेसबुक पिंट्या साहेबांच्या नव्या ‘जल-पर्यटनाचा’ आणि गाजरांचा पर्दाफाश!
१. दुष्काळाच्या झळा अन् साहेबांचे ‘फेसबुक लाईव्ह’चे गाजर!
धाराशिव जिल्ह्याला दुष्काळ पाचवीलाच पुजलेला आहे. गेल्या वर्षी धो-धो पाऊस पडला आणि ओला दुष्काळ आला, यंदा ४०-४५ दिवस झाले पावसाने दडी मारल्याने सोयाबीन पार वाळून गेलंय आणि ‘कोरडा दुष्काळ’ पडला आहे.
जेव्हा शेतकऱ्यांचे हाल पाहून शिवसेना (ठाकरे गट) नेते अंबादास दानवे आणि आ. कैलास पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन झाले, तेव्हा नेहमीप्रमाणे फेसबुक पिंट्या साहेबांच्या पोटात गोळा आला! मग साहेबांनी रात्रीच्या अंधारात लगेच आपला आवडता खेळ सुरू केला- ‘फेसबुक लाईव्ह!’ लाईव्हवर येऊन साहेबांनी, “शासन शेतकऱ्यांसाठी कशा उपाययोजना करणार आहे” याचे मोठमोठे डोस पाजत, नेहमीप्रमाणे विकासाचे आणि मदतीचे ‘डिजिटल गाजर’ दाखवून दिले.
२. चॅनेलवाले परंड्यात, तर साहेबांसोबत ‘पाकीटमार’ युट्युबर्स!
दुसऱ्या दिवशी सकाळी साहेबांना आपली हवा करण्यासाठी पत्रकारांचा दौरा काढायचा होता. पण अडचण अशी झाली की, जिल्ह्यातले मुख्य चॅनेलचे पत्रकार परंडा तालुक्यात गेले होते. कारण तिथे एमपीएससी (MPSC) अभ्यास करणाऱ्या एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली होती, आणि त्या प्रकरणावरून ‘कॉक्रोज जनता पार्टी’चे संस्थापक अध्यक्ष अभिजित दिपके तिथे आले होते.
मेनस्ट्रीम मीडिया नसल्यामुळे साहेबांनी आपली ठरलेली ‘वार्षिक पॅकेज’ आणि पाकीट घेणाऱ्या ‘युट्युब पत्रकारांची (YouTubers)’ फौज सोबत घेतली आणि थेट मोहोळ तालुक्यातील ‘घाटने बॅरेज’ गाठले! तिथे या पत्रकारांना साहेबांनी तुळजापूर तालुक्यात पाणी कसे येणार आहे, याची एक अत्यंत जुनी ‘पाणीदार गोष्ट’ ऐकवली.
३. बापाची ४० वर्षांची जुनी स्क्रिप्ट साहेबांच्या तोंडी!
साहेबांनी युट्युबर्सना जी ‘२१ टीएमसी (TMC)’ कृष्णा खोऱ्याच्या पाण्याची गोष्ट ऐकवली, ती ऐकून धाराशिवकरांचे कान आता किटले आहेत. कारण फेसबुक पिंट्या साहेबांचे वडील हेच २१ टीएमसी पाणी धाराशिवला मिळणार, हे गेले ४० वर्षे सांगत होते. आता बाप गेला आणि लेक तीच स्क्रिप्ट वाचून दाखवतोय!
मुळात सत्य हे आहे की, ७ टीएमसी पाणी योजनेचे काम सध्या अत्यंत ‘कासवगतीने’ सुरू आहे. पण साहेब मात्र हवेतच नद्या वाहवत आहेत.
४. सांगा फेसबुक पिंट्या , कृष्णा खोऱ्याचे पाणी ‘कोणत्या’ डिसेंबरमध्ये येणार?
साहेबांचा हा घाटने बॅरेजचा दौरा आणि पत्रकारांना नेण्याचा स्टंट नवीन नाही. २०२४ च्या निवडणुकीपूर्वीही फेसबुक पिंट्याने याच ठिकाणी पत्रकारांना नेऊन हीच जुनी कॅसेट वाजवली होती. विशेष म्हणजे, “डिसेंबर अखेर पाणी येणारच!” अशी थाप मारून त्यांनी सिंदफळ पंप हाऊसचे एकतर्फी आणि बेकायदेशीर उद्घाटनही उरकून घेतले होते. (त्यावेळी काँग्रेसने मोठा राडा करून साहेबांची फजिती केली होती, हे वेगळे!)
आज त्या घटनेला दोन वर्षे उलटून गेली. सिंदफळच्या पंपातून पाण्याचा एक थेंबही बाहेर आला नाही, पण फेसबुक पिंट्या मात्र तीच गोष्ट पुन्हा नव्याने, नव्या युट्युबर्सना सांगत आहेत.
आमचा साहेबांना थेट सवाल:
फेसबुक पिंट्या साहेब, तुम्ही आणि तुमच्या कुटुंबाने ४० वर्षे फक्त ‘पाण्याचं राजकारण’ केलं. २०२४ ला तुम्ही ‘डिसेंबरमध्ये पाणी येणार’ असं ठणकावून सांगत होता. आता आमचा तुम्हाला एकच साधा प्रश्न आहे- कृष्णा खोऱ्याचे ते पाणी नक्की ‘कोणत्या’ डिसेंबरमध्ये येणार आहे? २०३०, २०५० की २१०० च्या?
तात्पर्य: साहेब, पाकीटमार युट्युब पत्रकारांना सोबत घेऊन तुम्ही कितीही धरणांचे टुरिझम (Tourism) करा, पण जोवर शेतकऱ्यांच्या बांधावर पाण्याचा थेंब पडत नाही, तोवर तुमचे हे फेसबुक लाईव्हचे ‘गाजर’ कुणीही खाणार नाही!
कारण विसरू नका… “यह पब्लिक है, सब जाणती है!”




