महायुतीचा धर्म पाळायचा तर लांबच, पण धाराशिव जिल्ह्यात मात्र भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि शिंदे गटाचे माजी मंत्री तानाजी सावंत यांच्यातच सध्या ‘कांटे की टक्कर’ पाहायला मिळत आहे. “तू माझ्या अंगणात आलास, तर मी तुझ्या घरात घुसेन” याच न्यायाने आता सावंतांनी थेट राणा पाटलांच्या तुळजापूर मतदारसंघात जोरदार एंट्री मारली आहे.
मल्हार पाटलांची ‘५० हजारी’ आणि सावंतांचा ‘दोन लाखांचा’ चेक!
-
राणा पाटलांची खोडी: राणा पाटलांनी स्वतःचा मतदारसंघ वाऱ्यावर सोडून तानाजी सावंतांच्या परंडा मतदारसंघात दौरे सुरू केले. एवढ्यावरच न थांबता, आपले सुपुत्र मल्हार पाटील यांच्या हस्ते परंड्यातील दोन शेतकऱ्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत करून सावंतांच्या वर्चस्वाला थेट आव्हान दिले.
-
सावंतांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’: राणा पाटलांनी डिवचल्यावर सावंत गप्प बसतील तर ते तानाजीराव कसले? त्यांनीही थेट तुळजापूरकडे मोर्चा वळवला. तुळजापूर तालुक्यातील सिंदफळ येथील गुणवंत क्षीरसागर या शेतकऱ्याने नापिकीला कंटाळून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. सावंतांनी या घटनेचे निमित्त साधत आपल्या सहकाऱ्यांमार्फत क्षीरसागर कुटुंबाला थेट दोन लाख रुपयांचा मदतीचा धनादेश सुपूर्द करून पाटलांना ‘सव्याज’ परतफेड केली.
“अर्ध्या रात्री हा भाऊ धावून येईल!” – सावंतांचा राणादादांना टोला?

मदत देताना सावंतांनी केवळ धनादेश दिला नाही, तर डायलॉगबाजीची जबरदस्त पेरणी केली. “अर्ध्या रात्री जरी कसलीही मदत लागली, तरी तुमचा हा भाऊ तुमच्या हाकेला धावून आल्याशिवाय राहणार नाही,” अशी भावनिक साद त्यांनी तुळजापूरच्या जनतेला घातली.
या विधानाचा सरळसरळ अर्थ असा निघतो की, “तुमचा स्थानिक आमदार (राणा पाटील) मदतीला नसला, तरी मी परंड्यावरून धावून येईन!” या मदतीमागे माणुसकी असली तरी, त्यातील राजकीय ‘टायमिंग’ आणि ‘टार्गेट’ लपून राहिलेले नाही. मदतीच्या निमित्ताने सावंतांनी राणा पाटलांच्या बालेकिल्ल्यात कृषी उत्पन्न बाजार समितीचे भूम सभापती प्रवीण देशमुख, युवासेनेचे डॉ. चेतन बोराडे आणि इतर पदाधिकाऱ्यांचा फौजफाटा पाठवून आपले शक्तीप्रदर्शनच केले आहे.
थोडक्यात काय…
महायुतीतले हे दोन दिग्गज नेते सध्या एकमेकांच्या मतदारसंघात ‘समाजसेवा’ करण्याच्या स्पर्धेत उतरले आहेत. राणा पाटील परंड्याची काळजी करत आहेत, तर तानाजी सावंत तुळजापूरचे ‘तारणहार’ बनत आहेत. या राजकीय साठमारीत, “आमदारांनो, आधी आपापला मतदारसंघ सांभाळा!” असे म्हणण्याची वेळ आता दोन्ही मतदारसंघांतील जनतेवर आली आहे.
या दोन नेत्यांच्या ‘क्रॉस-मतदारसंघ’ मदतीच्या राजकारणाचा आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला फायदा होईल की फटका बसेल, असे तुम्हाला वाटते?





