भूम/परंडा : पुण्यात राहून रात्रंदिवस स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या परंडा तालुक्यातील खासापुरी येथील प्रथमेश दिलीप देशमुख (वय २५) या तरुणाचा दुर्दैवी अंत झाला. आर्थिक अडचणी आणि दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर त्याने टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. भविष्याचे स्वप्न उराशी बाळगून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या शेतकरी कुटुंबातील तरुणाच्या अशा जाण्याने खासापुरीसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
प्रथमेशच्या पश्चात चार बहिणी आणि आई असा परिवार आहे. वडिलांचे छत्र यापूर्वीच हरपले होते. कुटुंबातील एकुलता एक मुलगा गेल्याने देशमुख कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या दुःखद प्रसंगी आमदार कैलास पाटील यांनी खासापुरी येथे देशमुख कुटुंबीयांच्या निवासस्थानी भेट देऊन सांत्वन केले. त्यांनी प्रथमेशच्या आईसह कुटुंबीयांना धीर देत, “या कठीण काळात आम्ही खंबीरपणे तुमच्या पाठीशी आहोत,” असा विश्वास दिला. यावेळी त्यांनी देशमुख कुटुंबीयांना वैयक्तिक स्वरूपात आर्थिक मदतही सुपूर्द केली.

या भेटीदरम्यान प्रथमेशची आई, दाजी काकासाहेब घाडगे, शिवसेना जिल्हाप्रमुख रणजित पाटील, राकेश सूर्यवंशी, माजी सरपंच शंकर चव्हाण, बालाजी देशमुख, सचिन देशमुख, राजाभाऊ गायकवाड, बापुसाहेब देशमुख, मारुती ननवरे, साहेबराव पाडुळे, संदीप देशमुख यांच्यासह खासापुरी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, शेतकरी कुटुंबातील तरुण तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर येणारा आर्थिक व मानसिक ताण गांभीर्याने घेण्याची गरज आहे, अशी भावना उपस्थित ग्रामस्थांनी व्यक्त केली. अशा घटना रोखण्यासाठी प्रशासनाने विद्यार्थी आणि शेतकरी कुटुंबांसाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.
प्रथमेश देशमुख यांच्या कुटुंबाच्या पालनपोषणाची जबाबदारी काँग्रेस घेणार
परंडा तालुक्यातील खासापुरी येथील प्रथमेश दिलीप देशमुख या २५ वर्षीय तरुणाने पुण्यात बुधवारी (दि. ९) टोकाचे पाऊल उचलत जीवन संपवले. एमपीएससी परीक्षेची तयारी करून अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून कठोर मेहनत करणाऱ्या प्रथमेश यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबीयांसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे धाराशिव जिल्हाध्यक्ष उमेश राजेनिंबाळकर यांनी गुरुवारी (दि. १०) खासापुरी येथील प्रथमेश यांच्या निवासस्थानी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. या कठीण प्रसंगी देशमुख कुटुंबाला एकटे पडू दिले जाणार नाही. प्रथमेश यांच्या कुटुंबाच्या पुढील पालनपोषणाची जबाबदारी धाराशिव जिल्हा काँग्रेस स्वीकारणार असून, कुटुंबाच्या सुख-दुःखात काँग्रेस सदैव त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील, अशी ग्वाही राजेनिंबाळकर यांनी दिली.
प्रथमेश यांच्या निधनाची घटना अत्यंत वेदनादायी असून, अधिकारी होण्याचे स्वप्न घेऊन स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या या होतकरू तरुणाचे स्वप्न अधुरे राहिले, अशी भावना राजेनिंबाळकर यांनी व्यक्त केली. त्यांनी देशमुख कुटुंबीयांशी संवाद साधून त्यांच्या दुःखात सहभागी होत धीर दिला आणि प्रथमेश यांच्या स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे प्रथमेश यांच्या कुटुंबाच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यंदाही पावसाने ओढ दिल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून सोयाबीनसह उभी पिके करपल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.
शेतीचे नुकसान, स्पर्धा परीक्षेतील अपयश तसेच परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकतेबाबत विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होणारी अस्वस्थता अशा विविध प्रतिकूल परिस्थितींचा तरुणांच्या मानसिकतेवर परिणाम होऊ शकतो, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
पारदर्शक, निष्पक्ष परीक्षा व्यवस्था हवी : राजेनिंबाळकर
शेतकरी संकटात असताना त्यांना भक्कम आधार देणे आणि विद्यार्थ्यांना पारदर्शक, विश्वासार्ह व निष्पक्ष परीक्षा व्यवस्था उपलब्ध करून देणे ही सरकारची जबाबदारी आहे. मात्र या दोन्ही पातळ्यांवर सरकारचे अपयश दिसून येत असल्याची टीका उमेश राजेनिंबाळकर यांनी केली.
“प्रथमेशसारख्या होतकरू तरुणांची स्वप्ने अशा प्रतिकूल परिस्थितीची बळी ठरू नयेत. यासाठी सरकारने शेतकरी आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे संवेदनशीलतेने व गांभीर्याने पाहून आवश्यक पावले उचलावीत,” अशी मागणी त्यांनी केली.




