तुळजापूर – तुळजापूर तालुक्यातील एका गावात १४ वर्षीय अल्पवयीन मुलाला बळजबरीने शेतात ओढून नेऊन हातपाय बांधत अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. मुलाचा शोध घेण्यासाठी गेलेल्या चुलत्यालाही जातीवाचक हीन दर्जाची शिवीगाळ करत मारहाण व जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी तामलवाडी पोलीस ठाण्यात नराधमाविरुद्ध भारतीय न्याय संहिता, पोक्सो (POCSO) आणि ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
तामलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलगा १३ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ३.२० वाजेच्या सुमारास गावात असताना गावातीलच एका तरुणाने त्याला जबरदस्तीने शेतात नेले. तिथे आरोपीने मुलाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि त्याचे हातपाय बांधून त्याच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला.
मुलाच्या शोधात त्याचे चुलते घटनास्थळी पोहोचले असता, आरोपीने त्यांनाही जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी करत, या प्रकरणाची कुठेही वाच्यता केल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
पोक्सो, ॲट्रॉसिटी अन् BNS अंतर्गत गुन्हा नोंद
या घटनेनंतर पीडित मुलाच्या चुलत्याने १३ सप्टेंबर २०२६ रोजी तामलवाडी पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली. त्यांच्या प्रथम खबरेवरून तामलवाडी पोलिसांनी आरोपीविरुद्ध खालील कायद्यांन्वये गुन्हा दाखल केला आहे:
-
बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (POCSO) कायदा २०१२: कलम ४, ८, १२
-
अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा: कलम ३(१)(आर), ३(१)(एस), ३(२)(व्ही)
-
भारतीय न्याय संहिता (BNS): कलम १२७(२) (बेकायदेशीर डांबून ठेवणे), ११५(२), ३५२ आणि ३५१(२)(३)
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तामलवाडी पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.




