धाराशिव जिल्ह्यात सध्या पावसाने अशी काही दडी मारली आहे की, दुष्काळाने अक्षरशः तळ गाठलाय. गेले दोन महिने पाण्याचा टिपूस नाही, त्यामुळे डोळ्यादेखत उभं सोयाबीनचं पीक करपून गेलंय. शेतकरी हवालदिल होऊन आभाळाकडे डोळे लावून बसलाय. अशा या भीषण परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीवर हात ठेवायला जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री प्रताप सरनाईक साहेब प्रकटले… पण थांबा! ते दुष्काळ बघायला नाही, तर ‘झेंडा’ फडकवायला आले होते.

साहेबांचा धाराशिवचा ‘व्हिसा’ वर्षातून फक्त तीनदाच मंजूर होतो – १५ ऑगस्ट, २६ जानेवारी आणि १७ सप्टेंबर! उरलेले ३६२ दिवस साहेब ठाण्यातूनच धाराशिवचा ‘पालक’ धर्म निभावतात. त्यामुळे धाराशिवकरांना आता एक यक्षप्रश्न पडलाय की, आपले साहेब खरंच ‘पालकमंत्री’ आहेत की फक्त ‘झेंडा मंत्री’?
१७ सप्टेंबरला मराठवाडा मुक्ती दिनाचा झेंडा फडकवला आणि माध्यमांचे कॅमेरे पाहताच साहेबांच्या अंगात अचानक दुष्काळ दौऱ्याचं वारं संचारलं. आता संपूर्ण जिल्हा पिंजून काढायचा म्हणजे वेळ आणि कष्ट दोन्ही लागणार. साहेब ठाण्याचे, राज्याचे परिवहन मंत्री, त्यांना एवढा वेळ कुठून असणार? मग त्यांनी एक ‘स्मार्ट’ मार्ग काढला. विमानतळाच्या अगदी कुंपणाला लागून असलेल्या खेड गावात साहेब शिरले. काही मिनिटांतच त्यांनी या एका गावातून संपूर्ण जिल्ह्याच्या दुष्काळाचे ‘स्कॅनिंग’ केले! याला म्हणतात डिजिटल इंडियाचा खरा ‘फास्ट ट्रॅक’ दौरा. ‘उदाव्याभोवती गवऱ्या वेचायच्या’ आणि मोकळं व्हायचं, असा हा सगळा थाट!

नुसतं शेतात उभं राहून कसं चालेल? माध्यमांना काहीतरी ‘ब्रेकिंग’ दिलं पाहिजे ना! मग साहेबांनी थेट खिशातून मोबाईल काढला आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना व्हिडिओ कॉल लावला. फोन थेट शेतकऱ्याच्या हातात!
शेतकरी बिचारा पोटतिडकीने म्हणाला, “साहेब, परिस्थिती लय भीषण आहे!” तिकडून उपमुख्यमंत्र्यांची रेकॉर्डेड कॅसेट वाजल्यासारखा ठरलेला डायलॉग आला, “सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही… ५ ऑक्टोबरपासून पंचनामे सुरू होतील!” यावर शेजारी उभ्या असलेल्या सरनाईकांनीही ‘साहेब, जिल्ह्यात हीच परिस्थिती आहे’ अशी री ओढली. सोबत असलेले खासदार ओमराजे निंबाळकरही म्हणाले, “साहेब, मी फिरतोय, परिस्थिती खरंच गंभीर आहे.”
आता इथं शेतकरी मनातल्या मनात कपाळावर हात मारून घेत होता. पीक आज करपलंय आणि सरकारचे पंचनामे ५ ऑक्टोबरला सुरू होणार? म्हणजे काय पंचांग बघून, मुहूर्त काढून पंचनामे करणार आहात का? तोपर्यंत करपलेलं पीक काय ‘फ्रीझर’मध्ये ठेवायचं का? सरकार वाऱ्यावर सोडणार नाही म्हणतंय, पण इथं दुष्काळाने आधीच सगळं वाऱ्यावर उडवून लावलंय, त्याचं काय?
एकंदरीत काय, तर खासदार ओमराजे इकडे गावन् गाव फिरतायत, आणि आपले झेंडा मंत्री मात्र उंटावरून… माफ करा, ‘विमानातून’ शेळ्या हाकतायत. कॅमेऱ्यासमोर दोन-चार डायलॉग मारले, व्हिडिओ कॉलवर हजेरी लावली आणि काही मिनिटांतच साहेब विमानाने पुन्हा आपल्या ठाण्याकडे रवाना झाले.
आता धाराशिवचा दुष्काळ आणि करपलेलं सोयाबीन पुन्हा एकदा साहेबांची आणि पुढच्या ‘झेंडावंदना’ची वाट बघत उभं आहे!





