मुरुम – लोहारा तालुक्यातील अचलेर येथील सेवानगर तांडा येथे मागील भांडणाच्या कारणावरून बेकायदेशीर जमाव जमवून एका १९ वर्षीय तरुणावर तसेच त्याच्या आजी व चुलतीवर लोखंडी रॉड व लाथाबुक्क्यांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या मारहाणीत तिघेही जखमी झाले असून, याप्रकरणी मुरुम पोलीस ठाण्यात एकाच कुटुंबातील महिलांसह ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
संत सेवालालनगर, अचलेर (ता. लोहारा) येथील रहिवासी चेतन चंदू चव्हाण (वय १९ वर्षे) हे १२ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास सेवानगर तांडा (अचलेर) येथे होते.
यावेळी जुन्या भांडणाची कुरापत काढून गावातीलच आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवला. आरोपींनी चेतन चव्हाण यांना अश्लील शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी आणि लोखंडी रॉडने बेदम मारहाण करून जखमी केले. भांडणाचा आवाज ऐकून चेतन यांची आजी व चुलती या भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करण्यास आल्या असता, आरोपींनी त्यांनाही घाणेरडी शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले.
७ जणांविरुद्ध मुरुम पोलिसांत गुन्हा नोंद
उपचार घेतल्यानंतर चेतन चव्हाण यांनी २३ सप्टेंबर २०२६ रोजी मुरुम पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली. त्यांच्या प्रथम खबरेवरून पोलिसांनी खालील ७ आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे:
-
आरोपी : बासू केशु चव्हाण, अजित बासू चव्हाण, नितीन बासू चव्हाण, भारताबाई बासू चव्हाण, मनीषा अरुण राठोड, जयश्री नितीन चव्हाण आणि अनिता अजित चव्हाण (सर्व रा. सेवानगर तांडा, अचलेर, ता. लोहारा).
-
दाखल कलमे : भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), १९० आणि १९१(२)(३).
या प्रकरणाचा पुढील तपास मुरुम पोलीस करत आहेत.




