नळदुर्ग (तुळजापूर) : ऊस तोड कामगार म्हणून जाण्याच्या कारणावरून वाद उफाळून येत एका ४८ वर्षीय व्यक्तीला गैरकायद्याची मंडळी जमवून उसाने तसेच लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना तुळजापूर तालुक्यातील मुर्टा येथे घडली आहे. याप्रकरणी धनगरवाडी तांडा येथील तब्बल १० जणांविरोधात नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धनगरवाडी तांडा (ता. तुळजापूर) येथील रहिवासी प्रकाश भगवान पवार (वय ४८) हे ६ नोव्हेंबर रोजी सकाळी ९:३० वाजेच्या सुमारास मुर्टा येथे आले होते. यावेळी ऊस तोड कामगार म्हणून कामावर जाण्याच्या कारणावरून संशयित आरोपींशी त्यांचा वाद झाला.
या वादातून आरोपी गुणाबाई गोरख राठोड, विजय गोरख राठोड, अजय गोरख राठोड, दिलीप गोपी राठोड, सविता गुलाब पवार, रेणुका प्रकाश पवार, गुलाबा गोविंद पवार, प्रकाश गोविंद पवार, अक्षय गोपी पवार आणि मायाबाई अक्षय राठोड (सर्व रा. धनगरवाडी तांडा, ता. तुळजापूर) यांनी गैरकायद्याची मंडळी जमवली. त्यांनी प्रकाश पवार यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी आणि हातातील उसाने जोरदार मारहाण केली. या मारहाणीत प्रकाश पवार गंभीर जखमी झाले.
उपचारानंतर प्रकाश पवार यांनी ७ नोव्हेंबर रोजी नळदुर्ग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून नळदुर्ग पोलिसांनी नमूद १० आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), १८९(२), १९० आणि १९१(२) अन्वये दंगल व मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास नळदुर्ग पोलीस करत आहेत.


