लोहटा (कळंब) : पोलिसात तक्रार का दिली, या कारणावरून झालेल्या वादातून एका ३२ वर्षीय तरुणावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना कळंब तालुक्यातील लोहटा पश्चिम शिवारात घडली आहे. याप्रकरणी शिराढोण पोलीस ठाण्यात एका संशयिताविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लोहटा (पं.) येथील रहिवासी सुरेश रमेश चौधरी (वय ३२) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६:३० वाजेच्या सुमारास ते गावातील शिवारात असताना संशयित आरोपी अशोक गुणवंत आडसुळ (रा. लोहटा पं., ता. कळंब) याने त्यांच्याकडे जात “माझ्याविरोधात पोलिसांत तक्रार का दिली?” असा जाब विचारला.
यावरून अशोक आडसुळ याने सुरेश चौधरी यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वाद वाढल्याने संशयिताने सोबत आणलेल्या कोयत्याने चौधरी यांच्या डाव्या हातावर वार केले. या हल्ल्यात चौधरी यांच्या हाताच्या पोटरीजवळ खोलवर जखम होऊन ते गंभीर जखमी झाले.
घटनेनंतर जखमी सुरेश चौधरी यांनी शिराढोण पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून आरोपी अशोक गुणवंत आडसुळ याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(२) (धोकादायक शस्त्राने गंभीर दुखापत करणे) आणि ३५२ (शांतता भंग करण्याच्या उद्देशाने अपमान करणे) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शिराढोण पोलीस करत आहेत.


