तुळजापूर – श्री क्षेत्र तुळजापूर येथील बहुचर्चित आणि संवेदनशील मानल्या जाणाऱ्या तुळजापूर पोलीस ठाण्यात पुन्हा एकदा खाबुगिरी आणि मर्जीतील कर्मचाऱ्यांच्या पुनर्वसनाचा मोठा डाव उघडकीस आला आहे. अनेक वर्षे तुळजापूर पोलीस ठाण्यात ठाण मांडून बसलेल्या आणि कारभारावरून वादग्रस्त ठरलेल्या कर्मचाऱ्यांची काही काळापूर्वी इतरत्र बदली करण्यात आली होती. मात्र, आता सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्र महोत्सवाचे निमित्त साधून तुळजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांनी त्याच मर्जीतील कर्मचाऱ्यांना पुन्हा तुळजापुरात आणण्यासाठी शासकीय पत्रव्यवहाराचा घाट घातला आहे. यामुळे पोलीस वर्तुळात आणि नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली असून, “सांगा मांजरे साहेब, हा खटाटोप बंदोबस्तासाठी आहे की मोठ्या ‘वसुली’साठी?” असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे.
तुळजापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक ए. आर. मांजरे यांनी धाराशिवच्या पोलीस अधीक्षक कार्यालयाला पाठवलेल्या अधिकृत पत्रात, आगामी नवरात्र महोत्सवाच्या बंदोबस्ताचा ‘अनुभव’ असल्याचे कारण पुढे केले आहे. यामध्ये उमरगा पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार गणेश तुकाराम माळी (ब. नं. १५६०), तामलवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार अमोल शेषराव पवार (ब. नं. १७१७) आणि पोलीस अधीक्षक कार्यालयातील अर्ज चौकशी शाखेचे पोलीस अंमलदार सूर्यकांत दिलीप फुलसुंदर (ब. नं. १८५७) या तिघांना तत्काळ तुळजापूर पोलीस ठाण्यात हजर करण्याचे आदेश देण्याची मागणी करण्यात आली आहे.
जिल्ह्यात हजारो सक्षम आणि कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी उपलब्ध असताना, नेमके याच तीन कर्मचाऱ्यांना बोलावण्याचा अट्टाहास का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. हे तिन्ही कर्मचारी तुळजापूर परिसरात बरीच वर्षे कार्यरत असल्याने त्यांना येथील प्रत्येक गल्लीबोळ, व्यावसायिक आणि ‘अर्थपूर्ण’ उलाढालींची खडान् खडा माहिती आहे. नवरात्र महोत्सवात लाखो भाविक दर्शनासाठी येतात. या गर्दीच्या काळात मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार, अवैध धंदे आणि वसुलीचे रॅकेट सक्रिय असते, अशी चर्चा नागरिकांमध्ये नेहमीच रंगत असते.
अनेक वर्षांनंतर बदली झालेल्या या वादग्रस्त कर्मचाऱ्यांचीच ‘सेवा’ मांजरे साहेबांना नेमकी नवरात्रातच का आठवली? हा खरा बंदोबस्त आहे की स्वतःच्या फायद्यासाठी नवरात्रात वसुलीची मोठी यंत्रणा बसवण्याचा कट? अशा एकापेक्षा एक टोकदार प्रश्नांनी पोलीस दलाची प्रतिमा डागाळली आहे. वरिष्ठ पोलीस अधीक्षक आता या पत्रावर काय भूमिका घेतात आणि तुळजापूरच्या पवित्र नवरात्र महोत्सवाला भ्रष्टाचाराची कीड लागण्यापासून रोखतात का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.




