येरमाळा – राष्ट्रीय महामार्ग क्र. ५२ वरील तेरखेडा शिवारात भरधाव वाहनाने स्कूटीला समोरून जोराची धडक देऊन एका १९ वर्षीय तरुणाचा बळी घेतल्यानंतर घटनास्थळावरून पसार झालेल्या संशयित चालकाला आणि गुन्ह्यातील टेम्पोला धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने शिताफीने शोधून काढले आहे. ढोकी येथील आरोपीसह अशोक लेलँड कंपनीचा टेम्पो ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाईसाठी येरमाळा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
नेमका अपघात कसा घडला?
लक्ष्मीनगर, भूम (जि. धाराशिव) येथील रहिवासी असलेला यशराज श्रीकृष्ण चव्हाण (वय १९ वर्षे) हा तरुण २९ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी २.४५ वाजेच्या सुमारास आपल्या स्कूटीवरून (क्रमांक MH 25 BH 5581) जात होता.
तेरखेडा येथील वनविभागाच्या जागेसमोर राष्ट्रीय महामार्गावर (NH-52) अज्ञात वाहनचालकाने आपले वाहन अतिशय निष्काळजीपणे व हयगयीने चालवून यशराजच्या स्कूटीला समोरून जोराची धडक दिली. या भीषण अपघातात यशराज गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघात घडल्यानंतर संशयित चालक जखमी तरुणाला उपचारासाठी दाखल न करता किंवा पोलिसांना माहिती न देता वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला होता.
याप्रकरणी मयताचे वडील श्रीकृष्ण रामलिंग चव्हाण (वय ४२ वर्षे, रा. लक्ष्मीनगर, भूम) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून येरमाळा पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३४१/२०२६, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २८१, १०६(१) सह मोटार वाहन कायदा कलम १३४(अ)(ब) आणि १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तांत्रिक विश्लेषणावरून आवळल्या मुसक्या
अपघाताचे गांभीर्य लक्षात घेऊन येरमाळा पोलीस आणि धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली. स्थानिक गुन्हे शाखेने गुप्त बातमीदार आणि आधुनिक तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास चक्र गतिमान केले असता, अपघातास कारणीभूत ठरलेले वाहन राजेशनगर (ढोकी) येथील असल्याचे निष्पन्न झाले.
मिळालेल्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तत्काळ धाव घेऊन संशयित आरोपी शुभम अच्युत काळे (वय २२ वर्षे, रा. राजेशनगर, ढोकी, ता. जि. धाराशिव) याला ताब्यात घेतले. तसेच अपघातात सहभागी असलेला अशोक लेलँड टेम्पो (क्रमांक MH 47 Y 3425) जप्त केला. त्यानंतर आरोपी व वाहन पुढील कायदेशीर कारवाईसाठी येरमाळा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.
कारवाई करणारे पोलीस पथक
सदरची उल्लेखनीय कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर व अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सपोनि सुदर्शन कासार, येरमाळा ठाण्याचे सपोनि यशवंत घोडके, पोलीस हवालदार शौकत पठाण, प्रकाश औताडे, जावेद काझी, फरहान पठाण, शिवाजी घाडगे (येरमाळा पो. ठाणे) तसेच चालक पोलीस हवालदार नागनाथ गुरव आणि रत्नदीप डोंगरे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.





