कळंब- कळंब तहसील कार्यालयात प्रत्यक्षात अस्तित्वातच नसलेल्या संचिकेची (फाईल) बनावट व खोटी साक्षांकित नक्कल तयार करून, त्यावर तहसील कार्यालयाचे शासकीय शिक्के अनधिकृतरीत्या मारून ती वाशी दिवाणी न्यायालयात सादर केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. न्यायालयाची व शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी तहसील कार्यालयाच्या अभिलेखपालांच्या फिर्यादीवरून कळंब पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
कळंब येथील तहसील कार्यालयात साहाय्यक महसूल अधिकारी तथा अभिलेखपाल म्हणून कार्यरत असलेल्या विद्या किशोर रणदिवे (वय ५० वर्षे, रा. कळंब) यांनी या प्रकरणात सरकारतर्फे फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तेरखेडा (ता. वाशी) येथील रहिवासी आरोपी गौतम रंगनाथ कुंभार याने १३ मे २००९ ते ५ ऑक्टोबर २०२६ या दीर्घ कालावधीदरम्यान कळंब तहसील कार्यालयात अस्तित्वात नसलेल्या एका शासकीय संचिकेची बनावट आणि खोटी साक्षांकित नक्कल तयार केली. एवढेच नव्हे तर त्यावर तहसील कार्यालयाचे शासकीय शिक्के बेकायदेशीररीत्या वापरून कागदपत्रे खरी असल्याचा बनाव रचला.
त्यानंतर आरोपीने ही बनावट व दिशाभूल करणारी कागदपत्रे वाशी येथील न्यायालयात सुरू असलेल्या दिवाणी दावा क्र. ९०/२००९ मध्ये पुरावा म्हणून सादर केली. याद्वारे त्याने शासकीय यंत्रणा व न्यायालयाची थेट दिशाभूल करून मोठी फसवणूक केली.
कळंब पोलिसांत गुन्हा नोंद
हा बनावट दस्तऐवजांचा गैरप्रकार समोर आल्यानंतर अभिलेखपाल विद्या रणदिवे यांनी ५ ऑक्टोबर २०२६ रोजी कळंब पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यांच्या प्रथम खबरेवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे:
-
आरोपी : गौतम रंगनाथ कुंभार (रा. तेरखेडा, ता. वाशी, जि. धाराशिव).
-
दाखल कलम : भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१८(४) (फसवणूक).
तहसील कार्यालयाचे बनावट शिक्के आणि खोटे दस्तऐवज तयार करणाऱ्या या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा हात आहे का, याचा सखोल तपास कळंब पोलीस करत आहेत.






