धाराशिव – धाराशिव शहरातील जवाहर कॉलनी परिसरात असलेल्या एसटी विभागीय कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ एका ७८ वर्षीय वृद्धाला विनाकारण अश्लील शिवीगाळ करत दगडाने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून ठार केल्याची थरारक घटना समोर आली आहे. याप्रकरणी मयताच्या मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून धाराशिव शहर पोलीस ठाण्यात दोन संशयितांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
जवाहर कॉलनी, जीएसटी कार्यालयाच्या पाठीमागे (धाराशिव) येथील रहिवासी रमेश परशुराम सरकाळे (वय ७८ वर्षे) हे २७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजेच्या सुमारास जवाहर कॉलनीतील एसटी कार्यालयाच्या गेटजवळून जात होते.
त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या दोन संशयितांनी वृद्धाला अडवून विनाकारण अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आरोपींनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि जमिनीवरील दगडाने डोक्यात व अंगावर जोरदार प्रहार करून गंभीर जखमी केले. या अमानुष व प्राणघातक मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या रमेश सरकाळे यांचा मृत्यू झाला.
धाराशिव शहर पोलिसांत खुनाचा गुन्हा नोंद
वडिलांच्या हत्येनंतर मुलगा योगेश रमेश सरकाळे (वय ३६ वर्षे, रा. जवाहर कॉलनी, धाराशिव) यांनी २९ सप्टेंबर २०२६ रोजी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली. त्यांच्या प्रथम खबरेवरून पोलिसांनी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे:
-
आरोपी :
१) लखन माळी (रा. तांबरी विभाग, धाराशिव)
२) सुखदेव कदम (रा. धाराशिव)
-
दाखल कलमे : भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१) (खून), ११८(१), ११५(२), ३५२ आणि ३(५).
दिवसाढवळ्या एका ७८ वर्षीय वृद्धाची दगडाने मारून हत्या करण्यात आल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, या प्रकरणाचा पुढील तपास धाराशिव शहर पोलीस करत आहेत.





