धाराशिव : धाराशिव तालुक्यातील कावलदरा येथून २० वर्षीय तरुणाचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वराज गणेश जाधव (वय २०, रा. कावलदरा, ता. जि. धाराशिव) हा २ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास कावलदरा येथून बेपत्ता झाला.
अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी त्याचे गुप्तपणे व बेकायदेशीररीत्या अपहरण करून नेल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
याप्रकरणी स्वराज याची आई वंदना गणेश जाधव (वय ४४, रा. कावलदरा) यांनी ३ नोव्हेंबर रोजी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १४०(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्वराज जाधव याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर असून, या प्रकरणाचा पुढील तपास धाराशिव ग्रामीण पोलीस करीत आहेत.




