पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शशिकांत रावसाहेब मुंढे (रा. चिंचोलीराव वाडी, ता. जि. लातूर), प्रितम फुलचंद ठोंबरे (रा. सिंदफळ, ता. तुळजापूर) आणि इतर सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी महादेव रामचंद्र कापसे (वय ४५, रा. ज्योतीबाची वाडी, ता. बार्शी, जि. सोलापूर) हे २ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास तुळजापूर तालुक्यातील काटी येथील श्रीवर्धन ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड कारखान्यात होते.
यावेळी चार महिन्यांपूर्वी झालेल्या बगॅसच्या व्यवहारावरून आरोपींनी वाद घातला. हा व्यवहार पूर्ण करायचा नसून हिशोब करून उर्वरित पैसे तातडीने परत द्यावेत, अशी मागणी करण्यात आली. याच कारणावरून आरोपींनी गैरकायद्याची गर्दी जमवून फिर्यादीला शिवीगाळ केली आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले. तसेच उचलून घेऊन जाण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणी महादेव कापसे यांनी ३ नोव्हेंबर रोजी तामलवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३३३, ११५(२), ३५२, ३५१(२), ३५१(३), १८९(२) आणि १९१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास तामलवाडी पोलीस करीत आहेत.



