पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप भिकाजी नाळपे, किरण भिकाजी नाळपे, गणेश नाळपे (तिघे रा. जवळका, ता. वाशी) आणि अरुण तुकाराम उंदरे (रा. तांदुळवाडी, ता. वाशी) अशी आरोपींची नावे आहेत.
फिर्यादी अजित शिवाजी तांबडे (वय ३३, रा. उपळाई, ता. कळंब) हे कंपनीच्या वाहनांसह तांदुळवाडी शिवारातून पवनचक्की लोकेशन क्रमांक ७० कडे जात असताना आरोपींनी संगनमत करून शिवरस्त्यावरील काम थांबविले.
वाशी फाटा ते तांदुळवाडी-दहीफळ-जवळका-शेंडीकडे जाणाऱ्या शिवरस्त्याच्या दोन्ही बाजूंना चाऱ्या खोदून रस्ता अरुंद करण्यात आला. त्यामुळे सार्वजनिक रस्त्याचे नुकसान होऊन कंपनीच्या वाहनांची वाहतूक अडविण्यात आल्याचा आरोप आहे.
तसेच रस्त्यावर मुरूम टाकण्याचे काम करू देण्यासाठी आणि ट्रॅक्टर सोडण्यासाठी आरोपींनी २० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. पैसे दिल्याशिवाय खोदलेले खड्डे बुजवू देणार नाही, अशी धमकी देत शिवीगाळ केली आणि जिवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणी अजित तांबडे यांनी ३ नोव्हेंबर २०२६ रोजी वाशी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून चौघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०८(४), १२६(२), ११५(२), ३५२, ३५१(२)(३) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेचा पुढील तपास वाशी पोलीस करीत आहेत.



