धाराशिव : शहरातील ज्ञानेश्वर मंदिरासमोरून पतीसोबत दुचाकीवरून जाणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मिनी गंठण दुचाकीवरून आलेल्या तीन अनोळखी चोरट्यांनी जबरदस्तीने हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी आनंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात भामट्यांविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तांबरी विभागातील लिंबोणी बाग परिसरातील रहिवासी सुवर्णा मनीष सोनकवडे (वय ४५) या ६ नोव्हेंबर रोजी रात्री ८:३५ वाजेच्या सुमारास पतीसोबत मोटरसायकलवरून जात होत्या. ज्ञानेश्वर मंदिराच्या समोरून जात असताना, पाठीमागून एकाच दुचाकीवर आलेल्या तीन अनोळखी इसमांनी त्यांच्या दुचाकीजवळ येत अचानक सुवर्णा यांच्या गळ्यातील ३४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठण (अंदाजे किंमत ७० हजार रुपये) जोराने ओढून हिसकावून घेतले आणि अंधाराचा फायदा घेत तिथून वेगाने पसार झाले.
भरवस्तीत घडलेल्या या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी सुवर्णा सोनकवडे यांनी ७ नोव्हेंबर रोजी दिलेल्या फिर्यादीवरून आनंदनगर पोलिसांनी तीन अनोळखी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०४(२) (स्नॅचिंग/जबरी चोरी) आणि ३(५) (समान उद्देशाने एकत्रित गुन्हा करणे) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस या भामट्यांचा शोध घेत आहेत.

