धाराशिव – धाराशिव येथे अनधिकृत असलेल्या हातलाई मंगल कार्यालयात शिवसेनेचा मेळावा आज पार पडला . त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे घाईघाईने आले आणि फक्त २२ मिनिटात भाषण करून निघून गेले. या मेळाव्यास जिल्हयाचे पालकमंत्री तानाजी सावंत हे जिल्ह्यात असूनही दांडी मारल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे.
शिवसेना ( शिंदे गट ) मध्ये आता सरळ दोन गट पडल्याचे दिसून येत आहे. सुधीर पाटील यांनी काही दिवसापूर्वी भाजपला राम- राम ठोकून शिवसेना ( शिंदे गटात ) प्रवेश केला आहे. त्यांनीच आज धाराशिवमध्ये शिवसेनेचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यास शिवसैनिक कमी आणि पाटील यांच्या शाळा – महाविद्यालयातील विद्यार्थी,शिक्षक जास्त होते. तसेच या मेळाव्यात पाटील यांची बहीण , भाचा, काही छोटे कार्यकर्ते सोडले तर विशेष कोणाचे प्रवेश नव्हते. मुख्यमंत्री घाईघाईने आले आणि केवळ २२ मिनिटे भाषण करून निघून गेले.
या मेळाव्यात सुधीर पाटील यांनी स्वतःची आत्मस्तुती करीत असताना, मुख्यमंत्री निवेदन स्वीकारण्यात मग्न होते. त्यानंतर त्यांनी घाईघाईने २२ मिनिटे भाषण करून मुंबईकडे प्रयाण केले.
मुख्यमंत्री कार्यालयाकडून सुधीर पाटील यांचा उल्लेख सुरुवातीला जिल्हाप्रमुख करण्यात आला होता. धाराशिव लाइव्हच्या बातमीनंतर त्यात दुरुस्ती करण्यात आली. सूरज साळुंके यांचा उल्लेख जिल्हाप्रमुख तर सुधीर पाटील यांचा उल्लेख संघटक म्हणून करण्यात आला. तसेच सूरज साळुंके यांच्या होर्डिंग्जवर सुधीर पाटील यांचा फोटो नसल्याने चर्चेला उधाण आले होते.
पाटील यांनी आयोजित केलेल्या मेळाव्यास तानाजी सावंत आणि त्यांचे समर्थक गैरहजर राहिल्याने शिवसेनेच्या शिंदे गटात दोन गट पडल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.