धाराशिव जिल्हा, जो मराठवाड्यातील एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचा भाग आहे, आजच्या घडीला विकासाच्या बाबतीत मागासलेपणाचे प्रतीक बनला आहे. हा जिल्हा देशातील सर्वात मागासलेल्या जिल्ह्यांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर असून, याची ओळख केवळ श्री तुळजाभवानी आणि हवा – पाणी या दोन गोष्टींवरच मर्यादित झाली आहे. परंतु, गेल्या काही दशकांत या जिल्ह्याने विकासाच्या बाबतीत अत्यंत दुर्दैवी परिस्थिती अनुभवली आहे.
धाराशिवच्या नैसर्गिक परिस्थितीचा विचार केल्यास, तुळजापूरचे श्री तुळजाभवानी मंदिर हे जिल्ह्याच्या ओळखीचे केंद्रबिंदू आहे. परंतु, याशिवाय जिल्ह्याच्या हवेची गुणवत्ता खालावत चालली आहे. जलस्रोत कमी होत आहेत, आणि दूषित पाणी मिळणे ही नित्याची समस्या बनली आहे. यावर्षी आलेला पाऊस सुदैवाने जास्त झाला, पण अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील सोयाबीनसारख्या महत्त्वाच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षांना पुन्हा एकदा धक्का बसला आहे. यामुळे जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेवर प्रचंड परिणाम झाला आहे.
धाराशिव हे जिल्ह्याचे ठिकाण असूनही येथे कोणताही मोठा उद्योगधंदा नाही. शहराची लोकसंख्या केवळ १ लाख ३० हजार आहे, आणि शहरातील आर्थिक उलाढाल सरकारी नोकरावर अवलंबून आहे.शनिवार, रविवार आणि सुटीच्या दिवशी शहरात शांतता पसरलेली असते. रात्री ९ नंतर तर शहराच्या रस्त्यावर अघोषित संचारबंदी असल्यासारखी परिस्थिती निर्माण होते. घराचे बंगले झाले, गल्लीच्या कॉलन्या झाल्या पण शहराचा विकास ठप्प आहे. धाराशिवचा एकेकाळचा भाग असलेला लातूर जिल्हा विकासाच्या बाबतीत मोठ्या प्रमाणावर प्रगती करत आहे, मात्र धाराशिव “जैसे थे” या अवस्थेतच अडकून राहिला आहे.
धाराशिवच्या राजकीय इतिहासाचा विचार केला, चार दशके येथे डॉ. पद्मसिंह पाटील यांची बिनविरोध सत्ता होती. त्यांच्यावर नेहमीच जिल्ह्याच्या विकासाबाबत निष्क्रिय असल्याचे आरोप होत राहिले. त्यांच्या या कालखंडात जिल्ह्याच्या विकासाची दिशा ठरलीच नाही. जिल्ह्याचा विकास का झाला नाही, याबद्दल कायमच प्रश्न उपस्थित होत आले आहेत, पण उत्तर मात्र कोणीच देऊ शकलं नाही. विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर हे डॉ. पद्मसिंह पाटील यांचे पुतणे आहेत आणि त्यांनी आपल्या चुलत्यांवर खापर फोडून विकासाच्या समस्यांपासून स्वतःची जबाबदारी दूर केली आहे. परंतु, हेच खासदार पाच वर्षांपासून जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत असूनही त्यांनी कोणताही मोठा विकासकाम हाती घेतलेले नाही. त्यांच्या अडीच वर्षांच्या सत्ता काळात देखील परिस्थिती जैसे थेच आहे.
भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील, जे डॉ. पद्मसिंह पाटील यांचे पुत्र आहेत, त्यांनी विकासाचे मॉडेल दाखवले आहे. मात्र, प्रत्यक्षात कोणताही ठोस बदल दिसून येत नाही. त्यांच्या विकासाच्या गप्पा अजूनही कागदावरच आहेत, आणि जिल्हा प्रत्यक्ष विकासाच्या प्रतीक्षेतच आहे.
आता विधानसभा निवडणुका नोव्हेंबर महिन्यात होणार आहेत. या निवडणुकांच्या तोंडावर विकासाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर येईल. राजकारण्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडतील, पण प्रश्न आहे की धाराशिवच्या नागरिकांनी काय निर्णय घ्यायचा आहे? गेल्या अनेक निवडणुकांमध्ये पाहायला मिळाले आहे की, मतदार निवडणुकीच्या तोंडावर साड्या, पैसे आणि इतर प्रलोभनांच्या जाळ्यात अडकतात आणि पुन्हा त्याच उमेदवारांना निवडून देतात. यामुळे, एकाच वर्तुळात फिरत राहणारे हे चक्र संपत नाही, आणि विकासाच्या नावाखाली नेहमीच फक्त चर्चा आणि घोषणाच होत राहतात.
धाराशिव जिल्ह्याचा विकास का होत नाही, याचा विचार व्यापक पातळीवर करणे आवश्यक आहे. केवळ राजकीय स्वार्थासाठी मतदारांना फसवणे आणि विकासाच्या खोट्या वचनांवर सत्तेत येणे हे राजकारण्यांचे नेहमीचे धोरण झाले आहे. परंतु, मतदारांनाही आता जागरूक होणे आवश्यक आहे. जिल्ह्याचा खरा विकास कसा होईल, याचा गांभीर्याने विचार करूनच मतदारांनी मतदान करणे गरजेचे आहे. केवळ तात्पुरत्या फायद्यांच्या आहारी न जाता, जिल्ह्याच्या भविष्याचा विचार करणे आजच्या काळाची गरज आहे.
धाराशिवसारख्या जिल्ह्यांच्या विकासासाठी स्थानिक नेत्यांनी आणि नागरिकांनी हातात हात घालून काम केले पाहिजे. प्रगती आणि विकास हे केवळ घोषणांपुरते मर्यादित न राहता, प्रत्यक्षात कसे आणले जाईल, यासाठी ठोस योजना तयार करणे गरजेचे आहे. विकासाची नवी दिशा दाखवणारे सक्षम नेते आणि नागरिकांच्या एकत्रित प्रयत्नातूनच धाराशिवचा विकास होऊ शकतो. अन्यथा, हा जिल्हा कायमच मागासलेपणात अडकून राहण्याचा धोका आहे.मतदारांनी आता योग्य निर्णय घेऊन, धाराशिवला विकासाच्या प्रवाहात सामील करण्यासाठी योग्य नेतृत्व निवडणे गरजेचे आहे.
– सुनील ढेपे, संपादक, धाराशिव लाइव्ह
मो. ७३८७९९४४११