तुळजापूर – विधानसभा निवडणुकीला अजून महिना बाकी असताना, तुळजापुरात मात्र कुत्र्यांच्या उपमा आणि भू -भू ! छू -छू ची रंगतदार सर्कस आधीच सुरु झाली आहे. भाजपचे विद्यमान आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व संभाव्य उमेदवार ऍड. धीरज पाटील यांचा वाद तर थेट प्राण्यांच्या साम्राज्यात पोहोचला आहे.
शनिवारी एका कार्यक्रमात झालेल्या शाब्दिक वादात, राणा पाटील यांनी धीरज पाटील यांना चावणाऱ्या कुत्र्याची उपमा दिली. उत्तर म्हणून धीरज पाटील यांनी राणा पाटील यांना “डॉबरमॅन” अशी थेट उपमा दिली, इतकेच नव्हे तर त्यावर भू – भू आणि छू – छू असे आवाज काढत वादाला चिखलात आणून सोडले. प्रेक्षकांनी मात्र या पोरकट प्रकारावर डोक्याला हात लावून ‘ही निवडणूक आहे की कुत्र्यांची स्पर्धा?’ असा सवाल केला.
दरम्यान, शिवसेना (ठाकरे गट) कार्यकर्ते देखील या मातीच्या खेळात उडी घेत आहेत. धाराशिव शहरप्रमुख सोमनाथ गुरव यांनी सोशल मीडियावर “डॉबरमॅन” एवढेच लिहून वादाला अजून चार चाकं लावली. त्याच्यावर विविध कमेंट्स पडताहेत. त्यावर कहर म्हणजे खा. ओमराजे निंबाळकर यांचे स्वीय सहाय्यक संतोष खोचरे यांनी तर कुत्र्याचा फोटो पोस्ट करून त्याला “राणा” असे नाव ठेवले. आता हा वाद सोशल मीडियावर संपूर्ण कुत्र्यांच्या कळपात बदलण्याची चिन्हे दिसत आहेत.
काँग्रेसचा मित्र पक्ष असलेल्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी जणू याच निमित्ताने सोशल मीडियावर कुत्रे फिरवण्याचे काम जोरात चालवले आहे. आता पुढच्या काही दिवसांत भू – भू आणि छू – छू ची निवडणूक आणखी रंगेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.