तुळजापूर – महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या नवरात्र महोत्सवामुळे तुळजापूर नगरी सध्या भाविकांनी फुलून गेली आहे. मात्र काही दिवसांपूर्वी पडलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील गटारे तुंबून रस्त्यावर घाण साचली आहे, ज्यामुळे शहरात विविध आजारांचा प्रसार होत आहे.
ऑक्टोबर हिटमुळे वातावरणात सतत बदल होत असून, कधी ढगाळ तर कधी उन्हाचे वातावरण आहे. या कारणांमुळे थंडी, ताप, अंगदुखी यासारख्या आजारांनी लोकांना ग्रासले आहे. यामुळे तुळजापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
तुळजापूर-लातूर महामार्गावरील या उपजिल्हा रुग्णालयासंदर्भात आणखी एक समस्या समोर आली आहे. या रुग्णालयाला स्वतंत्र सर्व्हिस रोड नसल्यामुळे रुग्णांना रुग्णालयात प्रवेश करण्यासाठी एकाच गेटचा वापर करावा लागतो. विशेष म्हणजे, गेटसमोर कचरा साचल्याने रुग्णांना नाक मुठीत धरून रुग्णालयात जावे लागत आहे.
या रुग्णालयात १०० खाटांची मंजुरी असताना केवळ८० खाटा आहेत, तसेच आवश्यकतेनुसार स्वतंत्र इन-आऊट गेट असणे अपेक्षित आहे, मात्र येथे एकच गेट असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.