तुळजापूर – उद्योजक असो की नेता, अशोक जगदाळे यांची “पी हळद आणि हो गोरी” अशी राजकीय घोडदौड पाहायला मिळते. एकाच वर्षात तीन पक्ष बदलणारे जगदाळे सध्या राष्ट्रवादीत स्थिरावले असले तरी त्यांच्या मनाच्या भराऱ्या मात्र अद्याप शांत झालेल्या नाहीत! गणेशोत्सवाच्या शुभेच्छांमध्ये त्यांनी इतक्या नेत्यांना बगल दिली की, धाराशिव जिल्ह्यातील काँग्रेसला गाशा गुंडाळावा लागेल अशी चर्चा सुरू झाली आहे.
गणेशोत्सवासाठी लागलेल्या त्यांच्या फ्लेक्सवर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेते मधुकरराव चव्हाण आणि जिल्हाध्यक्ष अॅड. धिरज पाटील यांचे फोटो गायब होते. असं वाटतं, जगदाळेंनी फ्लेक्सवरूनच “काँग्रेसचा फ्युज” उडवायचं ठरवलं! अगदी राणाजगजितसिंह पाटलांनाही सात वर्षांपूर्वी अशाच पद्धतीने फ्लेक्सवरून हद्दपार करण्याची ‘कला’ त्यांनी दाखवली होती. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीआधीच महाविकास आघाडीत “तंटा मोड” झाला आहे की काय अशी कुजबुज सुरू झाली आहे.
जगदाळेंना तुळजापूर विधानसभा लढवायची इच्छा आहे, पण काँग्रेसला ही जागा आपली हक्काची वाटते. पाच वेळा आमदार राहिलेले मधुकरराव चव्हाण पुन्हा आखाड्यात उतरण्याच्या तयारीत आहेत आणि धिरज पाटीलही रिंगणात आहेत. त्यामुळे जगदाळेंनी आपल्या फ्लेक्सवर दोघांनाही गायब करून जणू “तुला कळलं नाही तर पाहू दे” असं काँग्रेसला सांगितलंय! आणि हो, त्यातच शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांना जागा देऊन काँग्रेसच्या लोकांच्या दुखऱ्या नसा चांगल्याच चाचपल्या आहेत.
गणेशोत्सवाच्या फलकाची दुरुस्ती करत जगदाळेंनी आता राष्ट्रवादीच्या जीवनराव गोरे यांना मान देऊन मतांचा ‘रोजगार मेळावा’ही लावला आहे. राजकारणाचा चाणक्यप्रणीत खेळ सुरूच आहे! तुळजापूरातलं हे ‘फ्लेक्स युद्ध’ आता महाविकास आघाडीसाठी मोठा डोकेदुखी ठरणार हे मात्र नक्की!