धाराशिव: धाराशिव जिल्ह्यात यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीन, मूग आदी खरीप पिके पूर्णपणे वाया गेली आहेत. मात्र, जिल्ह्यातील आठ पैकी तीन तालुक्यांना अतिवृष्टीग्रस्त यादीतून वगळण्यात आल्याने शेतकऱ्यांना शासकीय मदत मिळणार नाही, अशी धक्कादायक बाब समोर आली आहे.
धाराशिव जिल्ह्यातील सर्वच आठ तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली असताना प्रशासनाने तुळजापूर, उमरगा आणि भूम या तीन तालुक्यांना अतिवृष्टीग्रस्त यादीतून वगळले आहे. यामुळे या तालुक्यांतील शेतकऱ्यांना शासनाकडून कोणतीही मदत मिळणार नाही.
परतीच्या पावसाने या तिन्ही तालुक्यांत जोरदार हजेरी लावली असून काढणीला आलेल्या सोयाबीनसह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकरी अडचणीत सापडला असून त्याला नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत देण्याची आवश्यकता आहे. मात्र, प्रशासनाने जाहीर केलेल्या नुकसानीच्या यादीतून हे तीन तालुके वगळण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
महाविकास आघाडीने या प्रकाराचा निषेध करत प्रशासनाला तातडीने तालुक्यातील नुकसानीचा सुधारित अहवाल देण्याची मागणी केली आहे. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
हे नक्की वाचा