धाराशिव जिल्हा मराठी पत्रकार संघ म्हणजे केवळ नावापुरता संघ! अधिकृत नोंदणी नाही, नियंत्रण नाही, आणि व्यवस्थापनाची पार पडलेली धूळच धूळ! अध्यक्ष आणि सचिव हे दोन महारथी, “मणी” आणि “मल्ल”, ज्यांच्या ‘सत्ताकब्जा’ खेळामुळे संघाच्या हाती धुपाटणेच शिल्लक राहिले आहे.
पहिल्या किस्स्यात, पत्रकार भवनाच्या छोट्या इमारतीचा कब्जा मल्लाच्या पिलावणीने केला. हे भवन म्हणजे जुन्या काळातील पत्रकारांनी पै पै गोळा करून बांधलेले पवित्र मंदिर. पण मल्लाने त्याचेच पेपरचं कार्यालायत रूपांतर केले! त्यानंतर मणीने त्यावर कब्जा करून त्याचे कार्यालय थाटले. गमंत म्हणजे, या इमारतीचे पीआर कार्डच रद्द झाले, आणि हे सगळं ‘अनधिकृत’ ठरलं.
दुसऱ्या किस्स्याचा मामला आकाशवाणीसमोरच्या सहा गुंठे जागेचा. दहा वर्षांपासून त्या जागेवर बांधकाम सुरूच नाही! एक कार्यकर्ता सुभेदार याने हरकत घेतली, आणि जिल्हाधिकारी दिवेकर यांनी जागा परत घेतली. मणी आणि मल्ल यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला, पण कोर्टाने चक्क १४ लाख रुपये ठोठावले, जे शासनाच्या खजिन्यात जमा झाले.
आता तिसऱ्या किस्स्यात, सांजा रोडवरील अर्धा एकर जागा आधीच्या अध्यक्षांनी घेतली होती. पण ‘मणी-मल्ल’च्या निष्क्रियतेमुळे ती जागा देखील आता शासनाच्या ताब्यात जाण्याच्या मार्गावर आहे.
एकंदरीत, मणी आणि मल्ल यांच्या शाही कारभारामुळे संघाच्या तीन प्रॉपर्टी बोंबलत राहिल्या आहेत, आणि आता संघाला फक्त ‘कब्जा कसा गेला’ या गाण्याची तालबद्ध रटणी करावी लागणार आहे!
धाराशिव जिल्हा मराठी पत्रकार संघाबद्दल तुम्ही काही ऐकले असेल, तर लक्षात ठेवा की संघाचा अधिकृत नोंदणीचा मागमूसही नाही. हे एक प्रकारे हवाला प्रकरण आहे, जिथे कुणाचेच नियंत्रण नाही, पण फक्त मणी आणि मल्लच्या जोरावरच संघाचे अस्तित्व आहे. या दोघांमुळेच जिल्ह्यात चार-पाच वेगवेगळे पत्रकार संघ तयार झाले, जणू प्रत्येकजण आपले स्वतःचे दुकान मांडत आहे. चला तर, या मणी-मल्लच्या नाट्यमय कारभारावर एक नजर टाकूया!
पहिला किस्सा: पत्रकार भवनाचा कब्जा
संघाचे मुख्य कार्यालय, आंबेडकर पुतळ्याजवळ एक छोटी इमारत आहे. जुन्या काळातील पत्रकारांनी एकत्र येऊन पै – पै गोळा करून हे भवन बांधले. पण मल्ल नामक व्यक्तीने प्रथम यावर कब्जा केला आणि तिथेच आपल्या पेपरचे कार्यालय थाटले. त्याच्या पेपरचे प्रपंच सुरूच होते, पण काही काळाने मल्लाने स्वतःची नवी जागा घेऊन तिथे आपले कार्यालय हलवले. लगेच मणीने त्यावर कब्जा केला, आणि त्याने देखील आपल्या पेपरचे कार्यालय थाटले. पण अलीकडेच, प्रशासनाने ही जागा ‘अनधिकृत’ घोषित केली, कारण संघाला दिलेले पीआर कार्डच रद्द झाले होते. पण मणी आणि मल्ल यांना याचे काहीच वाटले नाही!
दुसरा किस्सा: आकाशवाणी समोरील जागा
धाराशिवच्या आकाशवाणी कार्यालयासमोरील सहा गुंठे जागा संघाला शासनाने दिली होती. पण या जागेचे भविष्य मात्र अधांतरीच राहिले, कारण गेल्या दहा वर्षांपासून या जागेवर कुठलेही बांधकाम झाले नाही. अखेर सुभेदार नावाच्या कार्यकर्त्याने या परिस्थितीला हरकत घेतली, आणि तत्कालीन जिल्हाधिकारी दिवेकर यांनी ही जागा परत शासनजमा केली. मणी आणि मल्ल कोर्टात गेले, पण कोर्टाने त्यांना १४ लाख रुपये भरायला सांगितले. निकालही त्यांच्या विरोधात लागला आणि शासनाच्या खजिन्यात १४ लाख रुपये जमा झाले. त्यामुळे तेल गेले, तूप गेले आणि हातात धुपाटणे आले.
तिसरा किस्सा: सांजा रोडवरील अर्धा एकर जागा
धाराशिव -सांजा रोडवरील एक अर्धा एकर जागा, पूर्वीच्या अध्यक्षांनी घेतलेली होती, त्याचा वापर केवळ संघाच्या उपक्रमांसाठीच होणार होता. पण मणी आणि मल्ल यांच्या निष्क्रियतेमुळे आता या जागेची देखील शासन जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. हळूहळू, संघाच्या तीनही प्रॉपर्टी एका पाठोपाठ शासनाच्या ताब्यात गेल्या आहेत, आणि मणी आणि मल्ल फक्त बघत बसले आहेत.
संघाच्या मालमत्तेचा खेळ
मणी आणि मल्ल, हे दोघे एकमेकांच्या सत्ताधारी तंत्राचे उत्तम खेळाडू आहेत. दोघांचेही कार्य असलेले विभाग वेगवेगळे आहेत, पण तरीही ‘कब्जा’ करायचा हा छंद दोघांनाही अतिशय प्रिय! पत्रकार संघाचे सर्व प्रॉपर्टी सरकारच्या ताब्यात गेल्यामुळे आता हा संघ म्हणजे फक्त नावापुरता उरला आहे. संघाच्या तिन्ही मालमत्तांवर आता मणी-मल्लचे नव्हे तर शासनाचे वर्चस्व आहे. संघाच्या एकाधिकारशाहीच्या नादात त्यांनी त्यांचेच ‘धुपाटणे’ बनवले आहे, आणि आता संघाचे सदस्य फक्त बसून बोंबलत आहेत.
एकूणच काय, धाराशिव जिल्हा मराठी पत्रकार संघाचे ‘मणी’ आणि ‘मल्ल’ हे दोन वीर आपल्या कारभारातून संघाला एका हास्यास्पद अवस्थेत घेऊन गेले आहेत. आज संघाच्या मालकीच्या प्रॉपर्टीवर सरकारी शिक्का बसलेला आहे, आणि या संघाचा भविष्य अंधारमय दिसत आहे!