धाराशिव: धाराशिव जिल्ह्यात चोऱ्यांचे सत्र सुरूच असून मुरुम, कळंब आणि आनंदनगर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत शेळ्या, बुलेट मोटरसायकल आणि टिव्हीएस मॅक्स मोटरसायकल असा एकूण ८३,००० रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत.
मुरुम: मुरुम पोलीस ठाण्याच्या हद्दीत अचलेर शिवारातील रोहन जमादार यांच्या शेतातील शेडमधून ८ शेळ्या, एक बोकड आणि चार पिल्ले असा एकूण ६३,००० रुपये किमतीचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केला आहे. ही घटना २५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ ते ९ या वेळेत घडली. चोरट्यांनी शेडचे पत्रे उचकटून शेळ्या चोरून नेल्याची माहिती आहे.
कळंब: कळंब पोलीस ठाण्याच्या हद्दीत शशिकांत इंगळे यांची ६०,००० रुपये किमतीची बुलेट मोटरसायकल चोरीला गेली आहे. ही घटना २५ ऑक्टोबर रोजी रात्री ९ ते २६ ऑक्टोबर रोजी पहाटे ५ या वेळेत घडली. चोरट्यांनी त्यांच्या घरासमोरूनच मोटरसायकल चोरून नेली आहे.
धाराशिव: : आनंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत विनायक शेळके यांची २०,००० रुपये किमतीची टिव्हीएस मॅक्स मोटरसायकल चोरीला गेली आहे. ही घटना २५ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ ते १२.३० या वेळेत घडली. पुष्पक मंगल कार्यालय जवळील पॅरा मेडीकल कॉलेज समोरील गेटजवळून त्यांची मोटरसायकल चोरीला गेली आहे.
तिन्ही घटनांप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.