उमरगा – शहरातील आरोग्य नगरीमधील पाटील मशिनरी दुकान रविवारच्या मध्यरात्री फोडून १७ लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे. दुकानातील पाण्याच्या मोटारी, केबल वायरसह अन्य साहित्य असे सुमारे १७ ते १८ लाखांचे साहित्य अज्ञात चोरट्यांनी लंपास केले आहे.
चोरीची माहिती सोमवारी (दि. ३०) सकाळी उघडकीस आली. मल्लिनाथ पाटील व प्रशांत पाटील यांचे पाटील कृषी सेवा केंद्र व पाटील मशिनरी असे पत्र्याचे शेड असलेले दुकान आहे. रविवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी पाठीमागील बाजूचा पत्रा उचकटून दुकानातील मोटरी, पंप, विजेचे वायर चोरले. विशेष म्हणजे जड साहित्य नेण्यासाठी चोरटे टेम्पो घेऊन आले होते, असे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत असल्याचे प्रशांत पाटील यांनी सांगितले.
पोलिसांना कळवल्यावर पोलिस निरीक्षक अश्विनी भोसले पथकासह घटनास्थळी पोहोचल्या. पाहणी करत पंचनामा केला. आमदार प्रवीण स्वामी यांनी भेट देत चोऱ्यांबाबत नाराजी व्यक्त केली. चोऱ्यांचा तपास लावून मुद्देमाल परत मिळवा व आरोपींना अटक करावी, असे निर्देश त्यांनी पोलिसांना दिले. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.
उमरगा पोलिस ठाण्याच्या हद्दीतून वर्षभरात चोरट्यांनी १२ घरफोड्यांतून १८ लाख १७ हजार ३०० रुपये, दरोडा व जबरी चोरीतून १ लाख २० हजारांचा तसेच शेती व बांधकाम साहित्य, शेतमाल, केबल, वीज पंप, दुचाकींसह ५१ विविध चोरीतील मिळून एक कोटी २८ लाख ५७ हजारांचा ८०५ रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. पोलिसांनी दोन चोऱ्या २४ हजार, चार घरफोड्या १ लाख ५९ हजार ५०० तर १५ विविध चोरीतील ८ लाख ८४ हजारांचा मिळून २९ गुन्ह्यांमध्ये १० लाख ६७ हजार ५०० रुपयांच्या मुद्देमालासह २६ आरोपींना अटक केली आहे. उर्वरित आरोपींसह चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात यश आले नाही.