उमरगा: उमरगा शहरातील एका युवकावर मुळज गावात काही अज्ञात मारेकऱ्यांनी खुनी हल्ला केल्याची घटना सोमवारी (दि. ३०) दुपारी दोनच्या सुमारास घडली.
भारत नगरातील रहिवासी लक्ष्मण रणजीत सूर्यवंशी (२२) याला काही लोकांनी मुळज गावी बोलावून घेतले. तेथे दुपारी दोनच्या सुमारास त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करून गंभीर जखमी करण्यात आले. त्यानंतर जवळच्या शेतात नेऊन टाकण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. रुग्णवाहिकेने गंभीर जखमी लक्ष्मणला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने उमरगा येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र पुढील उपचारांकरिता सोलापूरला रेफर करण्यात आले आहे.
पोलिस अधिक तपास करीत आहेत. या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झाला नाही. जखमी लक्ष्मणवर जीवघेणा हल्ला प्रकरणी यापूर्वी गुन्हा नोंद असल्याची माहिती पोलिस निरीक्षक अश्विनी भोसले यांनी दिली. हा प्रकार जुन्या भांडणातून झाला असावा, अशी शक्यता आहे.