नळदुर्ग : सोलापूर-उमरगा रस्त्यावरील नळदुर्ग बायपासच्या नव्या पुलावरून मोटारसायकलने जाताना चार तरुण खाली पडून गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.
बोरी नदीवर खंडोबा मंदिर जवळ बांधण्यात येत असलेल्या या पुलाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. मात्र, पुलावर सुरक्षेचे कोणतेही फलक, बॅरिकेट्स किंवा इशारे लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे वाहनचालक गैरसमजुतीतून पुलावरून प्रवास करत आहेत.
सोमवारी रात्री असाच प्रकार घडला. शॉर्टकट म्हणून पुलावरून जात असताना दोन मोटारसायकलवरील चार तरुण पुलाच्या खाली पडले. या अपघातात चारही जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघातग्रस्त तरुण हे वसंतनगर भागातील रहिवासी असून सागर राठोड, पंकज राठोड व अन्य दोन अशी या तरुणाची नावे आहेत.. त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, रस्त्याचे काम सुरू असताना सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही खबरदारी घेतली जात नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष घालून योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.
सोलापूर-उमरगा हा चार पदरी रस्ता गेल्या दहा वर्षांपासून संथ गतीने सुरू आहे. त्यात नळदुर्ग बायपासचे काम सहा किलोमीटरचे आता कुठे सुरू झाले आहे. बोरी नदीवर खंडोबा मंदिर जवळ एका पुलाचे काम सुरू आहे. परंतु या ठिकाणी फलक, बॅरिकेट्स, लाल झेंडे न लावल्यामुळे वाहनचालक गैरसमजूतीतून जात असल्याने अपघात होत आहेत