बीड – बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची सीआयडीकडून सध्या कसून चौकशी सुरू आहे. या प्रकरणी मयत संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी स्वतःहून सीआयडी अधिकाऱ्यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, सीआयडी अधिक्षकांनी त्यांना विश्वास दिला आहे की पुढील एक-दोन दिवसांत आरोपींना अटक केली जाईल.
धनंजय देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाल्मीक कराड यांचे निकटवर्तीय ज्योती जाधव हिची देखील सीआयडीकडून चौकशी सुरू आहे.
ज्योती मंगल जाधव ही धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथील रहिवासी आहे. या प्रकरणात तिची नेमकी काय भूमिका आहे आणि तिला अटक होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी , विधिमंडळात संतोष देशमुख यांच्या हत्येची तपशीलवार माहिती सांगताना, आरोपींनी कळंबच्या एका महिलेशी संधान साधून, देशमुख यांच्यावर घाणेरडे आरोप करणार होते, असा आरोप केला होता. ती महिला म्हणजे ज्योती मंगल जाधव असल्याचे समोर आले आहे.
या हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आल्यानंतर तपासात वेग आला असून, लवकरच आरोपींना अटक होण्याची शक्यता आहे.