परंडा : उसाचा ट्रॅक्टर बाजूला घेण्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या मारामारीत एका व्यक्तीला गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी परंडा पोलिसांनी 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तात्या महादेव ठवरे (वय 45, रा. कौडगाव) हे 1 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी सोनारी ते कौडगाव रस्त्याने जात होते. यावेळी दादा ईटकर, परमेश्वर पवार, सुमित दुबळे, अविनाश उर्फ पांडु हंगे, अतुल ईटकर आणि सचिन ईटकर (सर्व रा. सोनारी) यांनी त्यांना उसाचा ट्रॅक्टर बाजूला घेण्यास सांगितले. यावरून वाद वाढला आणि आरोपींनी ठवरे यांना शिवीगाळ करत लाथा-बुक्क्यांनी व काठीने मारहाण केली. तसेच, जीवे मारण्याची धमकी दिली.
या मारामारीत तात्या ठवरे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या तक्रारीवरून परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींविरुद्ध भा.न्या.सं.कलम 118(1), 115(2), 351(2), 352, 189(2), 191(2), 191(3) आणि 190 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास परंडा पोलीस करत आहेत.