तुळजापूर: मुंबईच्या सिद्धीविनायक मंदिराच्या धर्तीवर तुळजापूरच्या आई तुळजाभवानीच्या मंदिरातही ड्रेसकोड लागू करण्याचा धडाका जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी लावला आहे. मंदिर समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर केला जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. पण या निर्णयाला पाळीकर पुजार्यांनी त्वरित “नको रे बाबा!” म्हणत विरोधाचा नारळ फोडला.
या निर्णयाच्या आश्चर्यकारक टायमिंगमुळे जिल्हाधिकारी ओंबासे यांच्या डोक्यात हा ड्रेसकोडचा बाण नक्की कुठून आला, असा प्रश्न पडतो. अलीकडेच त्यांच्या बनावट नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्र प्रकरणाने खळबळ माजवली होती. त्यामुळे त्यांच्या आसपासचा “बातमीस्फोट तज्ज्ञ” गट आता नवनवीन फटाके टाकत जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवत असल्याची चर्चा आहे.
यापूर्वीही अशीच ड्रेसकोडची घोषणा केली होती. पण म्हणतात ना, “आई तुळजाभवानीच्या दरबारी उर्मटपणा चालत नाही!” त्यामुळे तो विषय चक्क दगडाखाली गाडला गेला होता. मात्र, जिल्हाधिकारी साहेबांना पुन्हा तो उकरून काढण्याचा मोह आवरला नाही.
“साहेबांचे फुंकनार पत्रकार कोण?”
जिल्हाधिकारी ओंबासे यांचे स्टेटमेंट म्हणजे दिवसभराच्या वैतागलेल्या पत्रकारांसाठी विनोदाचा खजिना असतो, असे चर्चेच्या गोटात म्हटले जाते. साहेबांकडे एक खास “खुशमस्करी” पत्रकार असल्याचे सांगितले जाते, जो रोज त्यांच्या कानात गोड गोड “बातमीबाण” फुंकतो. त्यामुळे साहेबही “आज काय स्टेटमेंट टाकावे?” याचा खेळ रोज रंगवत असतात.
“ड्रेसकोड का आणि कशासाठी?”
- मंदिरात ड्रेसकोड लागू झाल्यावर भजन-मंडळाच्या मावशा साडीतून सलवार-कुर्त्यावर जातील का?
- शॉर्ट्स घालणारे पर्यटक आता पायजमा घालून ‘प्रवेश सवलती’ मागतील का?
- आणि सगळ्यात महत्त्वाचे – मंदिराच्या बाहेर ‘ड्रेस कोड प्रमाणपत्र’ बनवणाऱ्या टपऱ्या उघडल्या जातील का?
हे सगळे प्रश्न अनुत्तरितच आहेत. पण एक मात्र नक्की – साहेबांचे नवीन स्टेटमेंट केव्हा आणि कुठून येईल, याचा नेम नाही!