धाराशिव – तामलवाडी पोलिसांनी मोठी कारवाई करत अंमली पदार्थ विक्री प्रकरणी तिघांना अटक केली आहे. मात्र, या कारवाईत अनेक संशयास्पद बाबी समोर येत आहेत. तब्बल 23 तास पोलिसांनी आरोपींना कुठे आणि कशासाठी ठेवले होते? तसेच मुख्य आरोपी पोलिस ठाण्यात ये-जा करत असतानाही त्यांना अटक का करण्यात आली नाही? या गंभीर प्रश्नांची उत्तरे पोलिसांकडे नाहीत.
गुन्ह्याची वेळ-साखळी आणि पोलिसांची संशयास्पद भूमिका:
- गाडी पकडली: 14 फेब्रुवारी रोजी पहाटे 4 वाजता
- गुन्ह्याची नोंद दाखवली: 14 फेब्रुवारी रात्री 10:30 वाजता
- गुन्हा दाखल केला: 15 फेब्रुवारी पहाटे 3 वाजता
तब्बल 23 तास आरोपी पोलिसांच्या ताब्यात होते, मग इतका उशीर का? पोलिसांनी आरोपींशी तोडपाणी केली का? आणि नंतर गुन्हा दाखल केला का?
- तामलवाडी टोल नाक्यावरील सीसीटीव्ही तपासले तर या प्रकरणाचा सर्व उलघडा होऊ शकतो .
मुख्य सूत्रधार बाहेरच, पोलिस ठाण्यात मुक्त संचार?
या प्रकरणातील काही मुख्य आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. मात्र, हे आरोपी अटक झालेल्यांना मदत करण्यासाठी पोलीस ठाण्यात ये-जा करत होते, वकिलाची व्यवस्था करत होते. त्यामुळे पोलिसांची भूमिका संशयास्पद ठरत आहे.
घरझडतीपूर्वीच पुरावे गायब?
आरोपींच्या घरांची झडती घेतल्यानंतर त्यापूर्वीच घरातील घातक वस्तू, शस्त्रे गायब केल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनीच आरोपींना आधीच माहिती पुरवली का? हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
मोबाईल तपास आणि मुख्य आरोपींवर कारवाई होणार का?
पोलिसांनी तीन आरोपींकडून चार मोबाईल जप्त केले आहेत. आता या मोबाईलचे कॉल रेकॉर्ड आणि सीडीआर (कॉल डिटेल रेकॉर्ड) काढून मुख्य आरोपींना अटक करणार का? की या तपासालाही दिशा न देता प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जाणार?
मुद्देमाल:
- 45 ग्रॅम एम.डी. (अंमली पदार्थ) – 2,15,000 रुपये
- गुन्ह्यात वापरलेली मोटार कार (एम.एच. 25 आर 5598) – 7,50,000 रुपये
- आरोपींकडील 4 मोबाईल – 1,72,000 रुपये
तपास कोण करणार?
या प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर संशय निर्माण झाल्याने स्वतंत्र तपास होण्याची मागणी होत आहे. पोलिसांच्या संरक्षणाखालीच हे गुन्हेगार मोठे होत आहेत का? याची चौकशी आवश्यक आहे.