नळदुर्ग – फिनोलेक्स केबल्स कंपनीचा 30 लाख रुपयांचा माल अपहार केल्याच्या प्रकरणी दोन जणांविरुद्ध नळदुर्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी नित्यानंद तानाजी मकाजी (वय 30, रा. जेजे नगर, वाघोली, पुणे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांनी फिनोलेक्स कंपनी, उरशे (ता. मावळ, जि. पुणे) येथून विजयवाडा (आंध्रप्रदेश) येथे 52.66 लाख रुपयांच्या केबल्स पोहोचविण्यासाठी आयशर ट्रक (एमएच 15 एफव्ही 9859) दिला होता. हा ट्रक आरोपी उमेश सुभाष राठोड (व्यवसाय – चालक, रा. फुलवाडी, ता. तुळजापूर) आणि दत्ता सुदाम कांबळे (व्यवसाय – क्लिनर, रा. बोरामणी, ता. दक्षिण सोलापूर) यांच्या ताब्यात होता.
मात्र, दिनांक 14 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 9 ते 15 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 2.30 वाजेपर्यंतच्या कालावधीत या दोघांनी एकूण 1.143 बॉक्स, 2.66 कॉईल्स, म्हणजेच तब्बल 30 लाख रुपयांचा माल अपहार केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी फिर्यादीने 19 फेब्रुवारी 2025 रोजी नळदुर्ग पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी भादंवि कलम 316(3), 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास नळदुर्ग पोलीस करत आहेत.
उमरगा येथे एटीएम अदलाबदल करून वृद्धाची 1.09 लाखांची फसवणूक
उमरगा – शहरातील स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या एटीएममध्ये कार्ड बदलून 1.09 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी उमरगा पोलिस ठाण्यात दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी शिवाजी केरबा वडरगे (वय 60, रा. तुगाव, ता. आळंद, जि. कलबुर्गी, कर्नाटक) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दिनांक 25 जानेवारी 2025 रोजी सकाळी 9.40 वाजता उमरग्यातील माणिकवार कॉम्प्लेक्स येथे असलेल्या SBI एटीएममध्ये ही घटना घडली. दोन अनोळखी इसमांनी त्यांच्या एटीएम कार्डची अदलाबदल केली आणि त्याचा गैरफायदा घेत 1,09,900 रुपये काढून घेतले.
या फसवणुकीनंतर आरोपींनी घटनास्थळावरून पलायन केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शिवाजी वडरगे यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
या प्रकरणी दिनांक 19 फेब्रुवारी 2025 रोजी उमरगा पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 318(4) आणि 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उमरगा पोलीस करत आहेत.
नागरिकांनी अशा प्रकारच्या फसवणुकीपासून सावध राहावे आणि एटीएम कार्ड वापरताना सतर्कता बाळगावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.