धाराशिव – जिल्हाधिकारी यांच्या शस्त्र व जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून धाराशिव शहरात दोन युवकांनी बेकायदेशीररीत्या तलवार बाळगल्याप्रकरणी पोलीसांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत.
पहिल्या घटनेत, आरोपी आदित्य किशोर मुंढे (वय 19, रा. कोट गल्ली, धाराशिव) याला धाराशिव शहर पोलिसांनी माउली चौक येथे एका तलवारीसह 19 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 1 वाजता ताब्यात घेतले. सदर तलवार अंदाजे 1,500 रुपयांची असून, तो ती अवैधरीत्या बाळगत असल्याचे आढळले. त्यामुळे पोलिसांनी शस्त्र कायदा कलम 4, 25 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1)(3) अंतर्गत धाराशिव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
दुसऱ्या घटनेत, आरोपी ऋषीकेश राजेश शिंदे (वय 20, रा. आरणी, धाराशिव) याला रामराजे चौक, भोसले हायस्कूल समोरील सार्वजनिक रोडवर पोलिसांनी दुपारी 2 वाजता तलवार बाळगताना पकडले. त्याच्याकडेही अंदाजे 1,500 रुपयांची तलवार मिळाली. त्याच्यावर धाराशिव शहर पोलीस ठाण्यात शस्त्र कायदा आणि महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
शहरात शस्त्रबंदी आदेश असतानाही काही तरुणांकडून तलवारीसारखी घातक हत्यारे बाळगली जात असल्याने पोलिसांनी गस्त वाढवली आहे. अवैध शस्त्रसाठ्यावर कारवाई करताना कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.