धाराशिव : शहरातील बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेत एका महिलेच्या गळ्यातील २५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याची घटना घडली. या प्रकरणी संबंधित महिलेने फिर्याद दिल्यानंतर आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पदमजा दत्तात्रय धालगडे (वय ४७, रा. कडकनाथवाडी, ता. वाशी, जि. धाराशिव) या १९ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी १२.१५ वाजता धाराशिव बसस्थानक येथे धाराशिव ते औसा एसटी बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील २५ ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास केले. चोरीची जाणीव होताच त्यांनी तातडीने पोलिसांकडे धाव घेतली.
या घटनेची फिर्याद त्यांनी आनंदनगर पोलीस ठाण्यात दिली असून, पोलिसांनी भा.दं.वि. कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर पोलीस अधिक तपास करत असून, बसस्थानकातील सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेतला जात आहे.शहरात अशा चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
रुई ढोकी व तडवळा शिवारातून १४ शेतकऱ्यांच्या १४ मोटारींची चोरी
ढोकी – रुई ढोकी व तडवळा शिवारातील शेतकऱ्यांच्या विहिरीवरील १४ इलेक्ट्रीक मोटारी अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्या. या मोटारींची एकूण किंमत अंदाजे १ लाख ५३ हजार रुपये आहे.
या संदर्भात रामकृष्ण बब्रुवान देटे (वय ५०, रा. रुई ढोकी, ता. धाराशिव) यांनी ढोकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, दिनांक १८ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री ७ वाजल्यापासून १९ फेब्रुवारी सकाळी ७.३० वाजेपर्यंत ही चोरी घडली. अज्ञात चोरट्यांनी वेगवेगळ्या कंपनीच्या १४ मोटारी चोरून नेल्या.
या घटनेनंतर शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून, विद्युत मोटारी चोरीला गेल्यामुळे त्यांच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकरणी ढोकी पोलीस ठाण्यात भा.दं.सं. कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.